खरंच, काय करत असेल ती सध्या..?
आज पुन्हा एकदा प्रश्न पडला..
नारायण पेठेतल्या माझ्या ८वी, ९वी च्या class च्या जवळून चाललो होतो... आजूबाजूला असणाऱ्या टपाऱ्यांकडे लक्ष गेलं.. तिथे माझ्याच वयाचा माझा एक मित्र सिगारेट ओढताना दिसला.. तोही यायचा ८वीत class ला तिथेच..
तो सगळाच area खरंतर माझ्या दृष्टीने तीर्थस्थानाइतका पवित्र आहे, कारण त्याच्या अलीकडच्या चौकात माझी दुसरी आई, माझी शाळा आहे... रमणबाग..! आणि पत्र्या मारुतीच्या चौकातून लोखंडे तालमीकडे जायला लागलो की मध्ये माझा लाडका class आहे! ही दोन्ही स्थळं त्या निरागस वयात माझी मंदिरं होती. अजूनही अर्थात तोच पूज्य भाव आहे मनात त्या जागांविषयी..
... आणि अशा ठिकाणी आपल्या एका जवळच्या मित्राला सिगारेट ओढाविशी वाटावी..? आत कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं वाटलं मला तेव्हा..
माझ्या class ने आणि माझ्या शाळेने आम्हाला काय नाही दिलं? कसं वागायचं हे सांगणारा धर्म दिला, आणि का वागायचं हे सांगणारी संस्कृती दिली..! ती फक्त अभ्यासाची स्थानं नव्हती, तर 'अध्ययनाची' पवित्र स्थळं होती..
--------------------------
दहावीच्या class च्या शेवटच्या दिवशी बाई सांगत होत्या,
"....... आता वहीत पेन टाका आणि इकडे लक्ष द्या. आजचा तुमचा आपल्या class मधला शेवटचा दिवस. इथून बाहेर पडल्यावर तुम्ही नवीन जगाला सामोरं जाणार आहात. तिथं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळतील. निरनिराळे प्रसंग तुमच्या समोर येतील. पण काहीही झालं तरी, आपले संस्कार आपले चांगले विचार सोडायचे नाहीत. येईल त्या परिस्थितीला समोरं जायचं.. स्वतःवर विश्वास ठेवून.."
त्यांचे बोल कानात साठवून आम्ही बाहेर पडलो. आमच्या क्लास मधले गुरुजन काय, किंवा शाळेतले काय, नुसते बोलत नव्हते.. तर तसं वागण्याची वृत्ती आमच्यात बाणत होते. मग हळूहळू सरावाने ती आमची प्रवृत्तीच होऊन गेली.
आज जरी सातत्याने त्या वातावरणात नसलो तरी, 'चांगलं' काय आणि 'आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट काय' याचा 'database' म्हणतात तसा मनात पक्का आहे.
..... पण असं असलं तरी त्याला तिथं सिगारेट ओढताना बघून माझ्या मनात विचार आला,
त्याच्या मनाला कधी या दिव्य विचारांचा स्पर्शच झाला नसेल का? की त्याचं मन ती चांगली वृत्तीच हरवून बसली असेल..? '
शाळेतलं आणि class मधलं वातावरण म्हणजे 'अभ्यासाची करीत जावा। काळ सार्थकी लावावा।'
या समर्थांच्या ओवीचा झंझावात होता. या झंझावतात चांगल्या विचारांचा मनाला स्पर्श न होणं केवळ अशक्य !
अशा वातावरणात वाढलेला तो..
पण आज ..?
त्याच्याच मनातली ती संस्कृती कुठे गेली असेल..?
काय करत असेल ती सध्या...?
-आशुतोष पुरोहीत
अतिशय सुंदर लिहिलंय!
उत्तर द्याहटवाआणि ती सध्या काय करतेय हा प्रश्न देखील मार्मिक आहे.
Btw क्लास कोणता पुरंदरे का देवधर .*)