शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते...

 लहानपणी माझी आजी आम्हाला रागवायची, “ कार्ट्यांनो, किती दंगा कराल! एक काम काही धड करू देत नाहीत ही कार्टी..” मग एखादा धपाटा घालायची.. आम्ही मुलं पुन्हा तिच्या मागे मागे करायला लागायचो.. कुठे तिच्या पदाराशीच खेळ, कुठे तिचे गालगुच्चेच ओढ.. असं काय काय चाललेलं असायचं.. मग इतक्यात आई यायची.. आम्हाला अभ्यासाला पिटाळायची.. मागोमाग शब्द असायचे.. “इतका वेळ timepaas करण्यापेक्षा जरा अभ्यास केला असतात, तर एव्हाना वर्गात पहिले आला असतात..” मग मात्र आम्ही चुपचाप अभ्यासाला लागायचो.. सगळ घर शांत व्हायचं..


आत्ताही अशाच शांत वेळी मी अभ्यासाला बसलोय.. पण हल्ली मात्र आई पूर्वीसारखं रागावत नाही.. आज्जी आधीसारखे धपाटे घालत नाही.. थोडा दम भरण वगैरे चालू असतं घरातल्यांचं.. पण त्यात पूर्वीसारखी मजा नाही..! पूर्वी म्हणजे आईची दहशत असायची.. एखादी गोष्ट तिने “करू नको.” असं वारंवार सांगितल्यावरही जर आम्ही ती केली.. तर मात्र आमची काही खैर नसायची.. कधी काठी, कधी अभ्यासाचं पुस्तक असं हाताला येईल ते घेऊन आई मारायची.. मग आम्ही रडायचो.. थोडा वेळ भोकाड पसरून झालं, की मग मारलेल्या ठिकाणी आई तेल लावून द्यायची.. भरल्या डोळ्यांनी..

तेल लावत असताना आई म्हणायची.. “ का असं वागता रे तुम्ही सारखं सारखं सांगूनसुद्धा..? शहाणा मुलगा व्हायचंय कि नाही आपल्याला??”

आम्ही शहाणे झालो की नाही, हे नाही माहिती मला.. पण आम्ही “मोठे” मात्र झालो...!

आत्ताही M3 चं पुस्तक हातात घेतल्यावर असं वाटतं की, हे गणित आईने येऊन शिकवावं.. हजारदा एकाच गोष्ट सांगावी.. मग आपण ती न आठवल्याबद्दल धपाटे खावेत..

पूर्वीच आईचं मारण, आज्जीच, “कार्ट्यांनो..” असं म्हणणं, या सगळ्याच्या पाठीमागे अगाध मायेचा ओलावा भरलेला असे.. आता ती माया संपुष्टात आल्ये असं नव्हे.. पण माझ्या एका ताईने तिच्या लेखात लिहलंय, “वय वाढलं की संदर्भ बदलतात.. आणि व्यक्त होणही..!!” अगदी तसच आहे.. मोठं झाल्यावर आईचा मार संपला, मोठ्यांची बंधन कमी झाली.. पण काही गोष्टी पूर्वी जशा होत्या, तशाच खूप गोड होत्या असं वाटतं आता..

ती माया, ती बोलणी, ती रागावणी..

सगळ सगळ miss करतोय खूप..

अभ्यासाच्या वेळी तर हमखास आठवण होते तिची...

कुठे गायब झाली ती..?

काय करत असेल ती सध्या...?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा