शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते...

 स्वयंपाकघरातलं सगळं आवरून झालं होतं.. 'चला हवा येऊ द्या' बघायला घरातले सगळे बाहेरच्या खोलीत गेले.. ती मंगळसूत्राशी चाळा करत खिडकीतून बाहेर बघत उभी होती.. समोर वडाचं झाड थाटात उभं होतं..


" ए नाही नाही.. पण माझा डाव होता ना, मग तू त्या गण्याला का दिलंस खेळायला..? "


"अगं ही पारंबी उंच आहे.. तुला नाही यायची धरता.. म्हणून.."


"उगाच काहीतरी बोलू नकोस.. तुला मला खेळायलाच नव्हतं द्यायचं.. म्हणून तू मुद्दाम चुकवलास डाव.."


"ए शरे, चल घे डाव.. किती चिडते गं.. चिडकी कुठची.."


"मी चिडले होय रे माकडा.. माझा डाव घेतलास वर मलाच बोलतोस होय.." 


" ए शरे, जास्त बोलू नकोस हा नाहीतर या पारंबीला लटकवीन तुला.."


" आणि माझे हात काय केळी खायला गेले असतील होय.. थांब.. बघतेच तुला.." 


....... काय भन्नाट होतो ना आपण तेव्हा..! सतत उत्साह असा सळसळत असायचा अंगात.. कसली भीती नाही की संकोच नाही... मुक्त आयुष्य ! 


मोठं झाल्यावर खरंच इतकं सगळं बदलतं का ? माझं ते अल्लड रूप कुठेतरी हरवलंय का? 

मला माझ्यातल्या त्या भन्नाट मुलीला परत भेटता येईल का? मी त्याच फॉर्म मध्ये खूप comfortable होते खरंतर.. 

माझ्यातलीच 'ती' मला पुन्हा एकदा होता येईल का..? 


खरंच... काय करत असेल 'ती' सध्या..?


- आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा