शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते..

 गावाकडची लोकं फार आपुलकीने बोलतात नं एकमेकांशी.. अगदी परक्या माणसालासुद्धा, साखर पाण्यात विराघळवी, इतक्या सहजपणे सामावून घेतात.. त्या लोकांनी फक्त माणसंच नाही, तर त्या माणसांमधली  आपुलकीसुद्धा जपलेली असते.. परवाच आमच्या गावी जाऊन आलो.. सगळ्यात सुखाची गोष्ट म्हणजे तिकडं mobile ला range च नसते... त्यामुळे साहजिकच आपण समोर असलेल्या प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.. 

गावाकडच्या लोकांची आपुलकी, जवळीक बघून खरंच थक्क व्हायला होतं.. आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांनी 'आपुलकी' वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर सगळ्यात पहिली भीती आपल्याला वाटते, ती म्हणजे, "समोरचा माणूस मला फसवणार तर नाही ना?, याच्या मनात काही वेगळं तर नसेल ना?" बरं, आणि आपण असे अचानक 'जवळीकीने' बोलायला लागलो, की समोरचाही माणूस बिचारा भेदरून जातो.. त्याला वाटतं, "हा मधेच का बरं एवढ्या प्रेमात आला...?"

अशी सगळी गंमत ! त्यामुळे गावातला तो आपलेपणा गावकऱ्यांखेरीज बाकी कोणाला साधत नाही.. 


मग आपण पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी येतो.. घडाळ्याच्या काट्यावर फिरायला लागतो.. सकाळी ७:२३ ची विरार फास्ट आणि संध्याकाळची ६:५८ ची चर्चगेट स्लो यामध्ये आपलं आयुष्य पुन्हा गुरफटून जातं.. 

पण कधीतरी या सगळ्या कामाच्या रामरगाड्यात या गावाची आठवण वाऱ्याच्या मंद झुळुके सारखी मनात येऊन जाते.. शांत सुखावून जाते.. 

शहराच्या रुक्ष वातावरणात ती आपुलकी, ती जवळीक आपण पार विसरून गेलेलो असतो.. 

आपल्याला पुन्हा ती अनुभवायची असते.. 

अशा वेळी खरंच हा एक प्रश्न मनात येतोच....


कुठे बरं हरवली ती..?

काय करत असेल ती सध्या...?


- आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा