गुरुवार, ३० मे, २०२४

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव

 लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव : निवडणुका !


एक भारत, श्रेष्ठ भारत!

आपला भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ताबडतोब, १८ वर्षापुढील वयोगटातील सर्व लोकांना कोणत्याही निकषावर भेदभाव न करता मतदानाचा समान अधिकार संविधान समितीने दिला. हे नुकत्याच राष्ट्राचं रुप धारण केलेल्या भारताचं मोठं धाडसी पाऊल होतं. जेव्हा देशाच्या नीतीमूल्याची आणि भवितव्याकडे चालणाऱ्या वाटचालीची योजना आखायची असते तेव्हा त्यात अनेक बुद्धिजीवी लोक अंतर्भूत असतात. या अशा बुद्धिजीवी लोकांच्या दृष्टिक्षेपात जनसामान्यांचा मोठा परिघ असतो. परंतु, काही वेळा बुद्धीच्या तराजूहून अधिक महत्वाचा असतो सर्वांना लोकशाहीत बांधून घेण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन! आपल्या संविधान समितीत झालेल्या चर्चांमधे केवळ तर्कट बुध्दीवादी योजना नसून, सर्वांना बांधून “एक भारत श्रेष्ठ भारत” हा धागा विणला आहे म्हणून हे संविधान महान आहे. भारताचा आत्मा जाणून त्याची एक राष्ट्र म्हणून सुसूत्र बांधणी करणे ही मोठी जबाबदारीची कामगिरी होती. सर्वधर्मसमभाव, विविधतेत एकता आणि भक्कम लोकशाही असा अपूर्व योग आपल्या भारतात आहे! याचं महत्त्व आपल्याला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत आपल्या हे लक्षात येत नाही की अमेरिकेसारखं आधुनिक प्रगत राष्ट्रदेखील स्त्रियांना मतदानाचे अधिकार १९२० सालापर्यंत देऊ शकलेलं नव्हतं!

आपण मत दिल्यानंतर राजकीय पक्ष त्यात फेरफार करुन काही भ्रष्टाचार कसा करतात हा स्वतंत्र टीकेचा विषय आहे. खरंतर त्या गोष्टीचा कितीही विचार केला तरी घरात बसून त्या विषयावर आपल्याला काहीही ढीम्म करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग त्या सगळ्या चर्चांचा उपयोग काय? आपण करू शकतो अशी एकच गोष्ट आहे , ते म्हणजे विचारपूर्वक केलेलं मतदान. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला कर्मयोग लक्षात घेऊन फळाबद्दल अति चिंता करत राहून कर्तव्यापासून च्युत नको होऊया.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय पक्ष आहेत. विविध संस्कृतींनी संपन्न असणारा आपला देश एक लोकशाही राष्ट्र म्हणून गौरवाने आज जगासमोर उभं आहे ते आपल्या या सर्वसमावेशक धोरणामुळेच. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत आपल्याला मतदान करायला मिळत आहे याचं मोठं भाग्य लक्षात घेऊन हे एक पवित्र कार्य समजून आपण सर्वजण राष्ट्रपुरुषाची पूजा बांधूया! लोकशाही साजरी करुया!

- आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा