शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते...

 पूर्वी माझ्या घराच्या खिडकीतून समोरच्या शेतातली हिरवळ दिसायची.. मी संध्याकाळी शाळेतून आलो, की ‘खिडकीतून हिरवळ पाहणे’ हा एक कार्यक्रमच असायचा..! ती हिरवळ पाहिली, कीच “घरी” आल्यासारखं वाटायचं.. २-५ मिनिट त्या हिरवळीकडे नुसत बघितलं ना, तरी ताज-तवान वाटायला लागायचं.. अंगातली शाळेची मरगळ कुठच्या कुठे पळून जायची.. त्या हिरवळीच्या बाजूला तिथल्या आजीबाईंनी काही फुलझाडं लावली होती.. गुलाब, जास्वंद, झेंडू तिथे अशी डोलत उभी असायची.. जणू त्या आजीबाईंची नातवंडच ती..!

ती हिरवळ माझ्याशी काही न बोलताच मला शांत सुखावून जायची.. तिचं रूपच इतकं बोलकं होतं कि बस.. आणखीन शब्दांची गरजच नाही....

आता मात्र आमच्या नवीन घराच्या hallची खिडकी उघडली, की समोर एक मोठी पाटी दिसते..

 ‘वांद्रे-कुर्ला संकुल आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!!’

त्या हिरवळीने माझं कधीच असं “सहर्ष” स्वागत केलं नाही.. तरीही ती “आपली” वाटायची.. माझ्याशी बोलत्ये असं वाटायचं..

अजूनही समोरच्या या संकुलाच “सहर्ष” स्वागत पाहिलं, की त्या काहीही न बोलता आपलंसं करून घेणारया हिरवळीची आठवण येते...

क्षणभर ती डोळ्यासमोरून तरळून जाते..

आणि मनात हा एक विचार येतोच...

अजूनही तशीच असेल का ती..? पुन्हा कधी दिसेल का मला ती..?


- आशुतोष पुरोहित


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा