नेहमीप्रमाणेच मुंबई विमानतळावर, भारतातून निघण्याची हुरहूर मनात बाळगून चेकइनच्या रांगेत उभा होतो. सहज मागे लक्ष गेलं तर उंच तिरंगा मुक्तपणे दिमाखात फडकत होता. मुंबई विमानतळावर वाहवत आलेली अवर्णनीय गर्दी तो तटस्थपणे बघत होता, असं उगाचच वाटलं.
या महाकाय कोलाहलात अनेक प्रकारची माणसं होती. कोणी डोळे पाणावून पालकांना निरोप देणारी, कोणी परदेशी लोक भारतभेटीसाठी आलेले परत चालले होते, कोणी व्यावसायिक आपल्या कामानिमित्त बाहेर उड्डाण घेत होते, कोणी आपल्या परदेशी स्थित कुटुंबीयांना भेटायला चाललेली, कोणी शिकायला, कोणी नोकरीसाठी, कोणी स्थलदर्शनासाठी, कोणी अजून कशाकशासाठी… माझं लक्ष वेधलं गेलं ते व्यक्तिशः प्रत्येक प्रवाशाच्या सतत घेतल्या जाणाऱ्या काळजीकडे आणि ती सेवा करत राबणाऱ्या मराठी चेहऱ्यांकडे… चेकइनला प्रचंड मोठी रांग असल्याने airline ची माणसे पूर्ण मागपर्यंत येऊन प्रत्येक प्रवाशांची कागदपत्र तपासत त्यांच्या cabin bags ना tags लावत होती. वृद्ध आणि अपंग प्रवाशांसाठी wheelchairची नुसती सोय नाही तर त्यांना मदत करायला आणि घेऊन जायला तिथे आपला मराठी माणूस असणं. प्रत्येक रांगेला दोन ते तीन माणसे अशी airline कडून हे काम करण्यासाठी नेमली होती. कोणी प्रवाशांना पुढची दिशा देत होतं, कोणी त्यांचे प्रश्न ऐकून त्यांची उत्तर देत होतं.. अशीच एक बाई त्या रांगेत, तिचं बाबागाडीतलं बाळ, चालणारं छोटं मूल, कडेवर एक अजून आणि तिच्या सगळ्या बॅग्स असं घेऊन उभी होती.. इतक्या जबाबदाऱ्या ती एकटी सांभाळत होती आणि जे मूल चालू शकत होतं ते दुडूदुडू धावत लांब पळत होतं त्यात त्या बाईची खूपच धांदल होत होती. Airline कडून असलेल्या एका बाईच्या नजरेस तिची ही धावपळ पडली. ती आपणहून त्या बाईच्या त्या धावणाऱ्या मुलाजवळ गेली, खाली बसली आणि त्या मुलाला समजावून सांगितलं आणि परत आपल्या आईकडे त्याला नेऊन सोडलं. प्रसंग तसा साधा आणि दिसायला छोटाच होता. पण तिची ही कृती एक माणुसकीचं दर्शन घडवून गेली. ज्या प्रवाशांना घाई झालेली आहे, ज्यांचं boarding तोंडावर आलंय,त्यांना mumbai airport वरच्या कर्मचाऱ्यांनी पार त्यांच्या security पर्यंत केलेलं व्यक्तिगत सहाय्य, कुठेतरी भारतीय समृद्ध आदरातिथ्याचं दर्शन घडवत होतंच.
जागोजागी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आणि आपले डोळे दिपवणारी अनेकविध चित्र आणि paintings, भारतीय चहा, योगा, आयुर्वेद, नृत्य, संगीत, खाद्यपदार्थ, वस्त्र, इत्यादी विमानतळावर दिमाखात आपली शोभा दाखवत उभं होतं. साध्या चहा विकणाऱ्यापासून झाडू मारणाऱ्यापर्यंत सर्वांना इथे काम आहे. विविध भारतीय Scents, perfumes, खेळणी, शिल्प, घर सजवण्यासाठीच्या अनंत वस्तू, या एक प्रकारे जगाला भारताची पहिली तोंडओळख करून देतात. केवढा हा जगडव्याळ कारभार आणि ते सांभाळणारी यंत्रणा! या प्रचंड यंत्रणेवर आज कित्येक लोकांची पोटं चालतायत.
इतक्यातच ध्वनिक्षेपकावरून होत असलेल्या मराठी सूचना ऐकून स्वत्वाची ओढ किती नैसर्गिक असते आणि ती पूर्ण केल्यावर कसं ‘पूर्ण’ वाटतं हे जाणवलं. जगाशी तोंडओळख करताना, आपलं म्हणणं आपल्याच भाषेत ठामपणे मांडणारा आजचा भारत आहे. ते जगाशी बोललेले बोल स्वागताचे, औदार्याचे, सहकार्याचे आणि स्वाभिमानाचे असतात हेही जाणवलं.
जागोजागी विक्रेत्यांजवळ असणारे QR codes digital india ची साक्ष देत होते. या विमानतळाकडे येताना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत चाललेली विकासाची कामं, मुंबईत द्रुत वेगाने बांधले जाणारे अनेक सेतू आणि भुयारे आपल्या देशाची जगात असणारी मागणीच सांगत होते. इतका विविधतेने संपन्न असलेला देश, आणि त्याच्या आर्थिक राजधानीला शोभणारा एकूण आवाका आणि कामांचा धबडगा चित्त वेधून घेत होता. Toll booth वर असणारे FasTags, वेगवान वाहतुकीची गरज सांगत होते. ठिकठिकाणी असणारी सज्ज पोलीस यंत्रणा, प्रवाशांच्या सोयीसाठी असणारे गच्च भरलेले food malls आणि इतर helpline यंत्रणा, या यंत्रणेची व्याप्ती सांगत होत्या.
ह्या सगळ्या कोलाहलात हे सगळं “आपलं” आहे, “माझं” आहे, माझ्या मातीतल्या माणसांनी घडवलेलं आहे, ही भावना खूप प्रबळ होती. कदाचित ह्या जाणिवांनी अंत:करण भरून गेल्याने डोळे पाणावले आणि तिरंग्याला “येतो लवकरच..” असं म्हणून जड पावलांनी मी immigration ला गेलो…..
-तोषा… (आशुतोष आमोद पुरोहित)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा