शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

Pause....!

 Pause.... एक शांतता... एक शून्य... एक निःशब्दता .. नाटकाच्या संवादातल्या शब्दांपेक्षा निःशब्द ज्याला कळतात, त्यालाच नाटकातली खरी गंमत कळते...

म्हणूनच म्हणतात ना, 'ज्याला वाक्य उत्तम वाचता आली, तो उत्तम वाचक नाही ;  ज्याला 'pause' उत्तम वाचता आला, तो उत्तम वाचक...!!'
काय अफलातून ताकद असते, एका pause मधे...!
विचार करा.. शे-पाचशे रसिकांनी भरगच्च भरलेलं नाट्यगृह... सगळा जनसमुदाय डोळ्यांचे आणि कानांचे प्राण करून समोर चालू असलेला नाट्यप्रयोग अनुभवतोय...! प्रयोगालाच जणू 'योगावस्था' प्राप्त व्हावी, इतका रंगतो प्रयोग...!!!
का ?? कोण माखतं हा रंग त्याला...? 'Pauses'....
नाटकातले pauses हा रंग चढवतात, आणि मग प्रयोग अधिकाधिक देखणा होत जातो...!!
प्रत्येक pause हा बोलका असतो.. त्याची अबोली आपल्यालाही बोलकं करते..! कदाचित, अबोली हीच त्याची खरी बोली असते...!!! 'स्वल्पविराम' हे त्याचं रूप असतं. 'पूर्णविराम' हेही त्याचंच रूप असतं, कारण विराम जरी 'पूर्ण' असला, तरी त्यात पुढच्या वाक्याची प्रतीक्षा आणि आधीच्या वाक्याचा परिणाम असतो, मग त्याला 'पूर्ण' तरी कसा म्हणणार...?
पण जसा अपवादानेच नियम सिद्ध होतो, तसं अपूर्णत्वानेच 'पूर्णत्व' सिद्ध होत असावं, असं मला वाटतं...!
बास... आता पुढे काही सुचत नाही..
कदाचित, एक असाच pause भरून राहिला असेल, माझ्याही  आतमध्ये...!!

- आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा