रविवार हा आपल्या सगळ्यांचाच लाडका वार. काही जणांना उशीरा उठता येतं, म्हणून रविवार आवडतो, तर काहींना खरेदीला जाता येतं म्हणून आवडतो. मला मात्र रविवार आवडतो, तो एका निराळ्याच कारणासाठी...
ते कारण म्हणजे, माझी रविवारची अंघोळ..! तशी; अंघोळ मी रोजच करतो. पण रविवारची अंघोळ खासच..
बरोब्बर दुपारी 12 वाजता, आमच्या न्हाणीघराच्या खिडकीतून सूर्यप्रकाशाची तेजस्वी तिरीप चोरपावलांनी आत येते ! गरम पाण्याची बादली न्हाणीघरातच ठेवलेली असते. खिडकीतून येणारी ही तिरीप भिंतीवरुन पुढे सरकत सरकत, त्या गरम पाण्याच्या बादलीत उडी मारते ! तिरीप पाण्यात गेल्यावर, पाण्याची बादली ते खिडकी अशी एक घसरगुंडी तयार होते. घड्याळाचा काटा जसजसा पुढे जातो, तसतशी, ती तिरीप आणखीनच चमकायला लागते.. तेव्हा असं वाटतं की, सूर्यच त्या घसरगुंडीवरून सुर्र्कन घसरत येऊन त्या पाण्यात डुबकी मारतोय..! त्यानं डुबकी मारल्यावर पाणी आणखीनच गरम होतं. पण तो मात्र मनसोक्त न्हाऊन घेतोय !
लहान बाळाला, अंघोळीच्या वेळी, पाण्याच्या टबमधे उभं केल्यावर, ते कसं पाण्याशी खेळतं; तसाच हाही पाण्याशी खेळतोय...!!! या लखलखत्या तेजोनिधीच्या अंघोळीमधलं ऐश्वर्य पाहून समाधान वाटतं...
आणि यानंतर, स्वतःच्या डोक्यावर या बादलीतल्या तेजस्वी पाण्याचा अभिषेक करून घेण्यात जो आल्हाद आहे ना, त्याला तोड नाही...
त्यावेळी स्वामी स्वरूपानंदांचीच ओवी आठवते..
भक्तिभावे करिता स्नान l
निर्मळ होय अंतःकरण l
जीवासी परम समाधान l
साक्षात् दर्शन श्रीशिवाचे ll
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा