शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

एक भेट...

 खूप वर्षांनंतर तो तिला भेटला होता.. खरंतर आता बोलण्यासारखं काहीच नव्हतं.. ना विषय, ना कारण..

तरीही त्यांची भेट झाली होती..
का झाली? कशी झाली?... फारसं महत्वाचं नाही ते.. नुसते बसून होते दोघंही; माना खाली घालून..
जुजबी बोलणं सुरुवातीलाच उरकल्यामुळे, दोघांचेही बोल आता आटले होते..!
पण एक मात्र विशेष होतं. Mobile वगैरे सारख्या कुठल्याही गोष्टीला हातही न लावता दोघं एकमेकांसमोर बसून होते ! (हल्ली असं पहायला मिळत नाही !😉 ) एकमेकांसमोर असले तरी एकमेकांसाठी होते का?... त्यांचं त्यांनाच माहिती नव्हतं.. ते फक्त होते बस..

कायद्याने तर दोघे केव्हाच वेगळे झाले होते, त्यामुळे आता खरंतर त्यांना एकमेकांना भेटायचं काही कारण नव्हतं.. पण तरीही आत काहीतरी हलत आणि सलत असावं, म्हणून त्यांची भेट झाली असावी...
त्यानं चहाचा घोट घेतला, आणि वरकरणी सहज वाटावा असा एक प्रश्न तिला विचारला... ," बाकी काय ?"...
आता, तो तिच्या आयुष्यातून 'वजा' झाल्यावर बाकी काय उरली असेल ? असा प्रश्न आपल्याला पडतो..
पण, खरंच बरंच काही बाकी होतं..!! नक्कीच होतं.. तिनं स्वतःच्या पायावर उभं राहून निर्माण केलेलं विश्व होतं..! मागचं सगळं विसरून नव्याने जगायचा केलेला यशस्वी प्रयत्नही होताच की..!
मग तरीही त्याच्या "बाकी काय ?" या प्रश्नानंतर त्या दोघांत एक शांतता का निर्माण व्हावी बरं ??
ती शांतता न बोलताच अनेक राग आळवून गेली...!!!
जुने जुने..!
भूतकाळ 'रम्य' असतो, असं म्हणतात.. त्यामुळेच कदाचित, क्षणभर का होईना, ती त्या जुन्या बंदिशींमधे
गुंतली. नकळत स्मित उमटलं चेहऱ्यावर.. ते सूर जरी आता परत गवसणार नसले, तरी, ते कधीतरी आपल्या आयुष्यात होते ही जाणीवच तिला सुखावून गेली...

शेवटी त्याच्या, "बाकी काय?" या प्रश्नाला तिनं उत्तर दिलं...
"काही नाही.." ती म्हटली..
हे म्हणताना, तिचा स्वर कातर झाला नाही, अश्रू डोळ्यांत आले नाहीत...
पण हो !...

डोळ्यांवर आलेली बट, तिनं पुन्हा एकदा मागे सारली होती...!!!

-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा