कधी मोकळा वेळ असला, की माझा हा Evernote उघडून बसतो मी. आधी कधी लिहलेल्या गोष्टी, कविता, ब्लॉग्स झपझप जातात डोळ्यांपुढून, सिनेमाच्या ट्रेलर सारखे ! प्रत्येकात मी मलाच शोधायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो, एवढं मात्र खरं. मला माहीत नाही मला काय मिळतं हे लिहून. लौकिक अर्थाने तर काहीच नाही. पण लिहून झाल्यानंतरचं जे समाधान असतं ना, ते एका रुपेरी कोंदणात ठेवावं आणि लागेल तसं पुरवून पुरवून वापरावं असं कायम वाटतं मला. आपल्या आजूबाजूच्या जगाचा असा काही अनुभव घ्यावासा वाटतो मला, की त्याने वाचणाऱ्याला सुद्धा समृद्ध वाटेल. काहीतरी मिळल्यासारखं वाटेल.
परवा मुंबई आकाशवाणी ला माझे 3 ब्लॉग्स रेकॉर्ड करून आलो. मला बऱ्याचदा प्रश्न पडतो, का करतो मी हे सगळं ? आधी लिहिण्याचे कष्ट, मग इथून उठून तडतडत तिथे चर्चगेट ला जा, तिथे आकाशवाणी मध्ये जाऊन हे सगळं रेकॉर्ड करा. कुठून येते ही प्रेरणा ? ही शक्ती ?
प्रत्येक माणसाला या जगाला काहीतरी देण्याची एक मूलभूत प्रेरणा असते, त्यातूनच हे बळ येत असावं बहुदा. या बळालाच कोणी परमेश्वर असं म्हणतात !
असो ! जे आहे, जसं आहे, तसं चालू द्यावं, नाही का?
तुम्ही आपले वाचत राहा, मी आपला लिहीत राहतो, म्हणजे झालं !
- आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा