" १० मिनिटात whatsapp बघून होतं माझं.. आणि उरलेल्या १० मिनिटात फेसबुक.." माझी मावशी माठात पाणी भरताना सांगत होती.
ती कल्याण ला राहते आणि माझ्या मावशीचे मिस्टर, त्यांना मी काका म्हणतो, त्यांचं ऑफिस आहे फोर्ट ला.
" सकाळी ४ वाजता दिवस सुरू होतो आमचा.
४ ते ५-५:३० पर्यंत स्वयंपाक होतो, तोपर्यंत अनिश (मावशीचे मिस्टर) त्याचं त्याचं आवरून घेतो. त्याला ६ ची गाडी पकडावी लागते."
" अगं पण काकाचं ऑफिस 9:30 ला असतं ना?" मी तिला तोडत मधेच विचारलं.
" तरीपण ६ ची गाडी पकडतो तो. म्हणजे मग निवांत जाता येतं. गर्दी लागत नाही गाडीला. पावणेआठ च्या आसपास निघालं, तर गाड्यांना प्रचंड गर्दी लागते. तसंही येताना काही ती चुकलेली नसते! मग जाताना पुन्हा त्याच चेंगराचेंगरीतून कशाला जा !"
" Hmmm.. By the way, तू तुझं schedule सांगत होतीस.." मी.
" हा.. तर ५:३०-५:४५ ला अनिश गेला, की मग मी माझं आवरते. ६:३० पर्यंत आवरून मीही घराबाहेर पडते. मी कॉलेजात पोहोचेपर्यंत ९ वगैरे होतात.. दादरला जाते मी. मग... माझं कॉलेज सुटतं ५ वाजता. येताना मला बरोबर साडेपाच वाजताची कल्याण गाडी मिळते. ती पकडून ७-७:३० पर्यंत मी घरी ! घरी आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक. तो होईपर्यंत अनिश येतो मग आम्ही जेवतो आणि सव्वादहाच्या सुमारास घोरायलाही लागतो ! वेळ कुणाला आहे इथे whatsapp नि फेसबुक वर घालवायला ? रोजच्या लोकल गाड्यांची तंत्रं नि वेळा सांभाळता सांभाळता जीव मेटाकुटीला येतो पार. दादरला त्या घामट गर्दीत चढताना जीव इतका दमून जातो की घरी आल्यावर फक्त अंग टाकायचं बाकी असतं. अनिशचीही काही वेगळी परिस्थिती नसते ! तो तर ५:३० ला जातो, तो एकदम रात्री येतो ८:३० ला. कसाबसा जेवतो.. जेवतो कसला दोन घास पोटात ढकलतो इतकंच.. आणि आम्ही दोघं जे मेल्यासारखे झोपतो ! पण खरं सांगू..? त्या दमून आडवं होण्यात जे समाधान असतं ना, ते या पृथ्वीवर कुठेच मिळणार नाही असं वाटतं तेव्हा.. त्या दमण्यासाठी आणि त्या साखरझोपेसाठी आम्ही दिवसाचे १२-१४ तास राब राब राबतो. बर, माझ्याकडे काही घरकामाला बाई नाही. सगळं मीच करते. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी, किंवा कधी लवकर घरी आला तर अनिशही करतो मदत. दोघंही खूप दमतो म्हणूनच कदाचित सुट्टीच्या दिवशी खूप quality वेळ spend करतो आम्ही दोघं. संध्याकाळी घरी आल्यावर देवापुढे निरांजन लावताना सुद्धा इतकं समाधान वाटतं माहित्ये ? त्यानं दिलेल्या या देहाचं कष्ट करून चीज करतोय असं वाटतं. म्हणूनच नैराश्य, frustration वगैरे आम्हाला येत नाही. कारण वेळच नसतो ही एक गोष्ट; आणि दुसरं म्हणजे, रोज प्रवासात किंवा बाहेर फिरताना ही मायावी मुंबई आयुष्याची इतकी रूपं दाखवून जाते ना ! काही भयानक असतात, तर काही मोहक असतात. मग असं वाटतं आपण किती छोट्या छोट्या गोष्टींचा इशू करत असतो ! दादर स्टेशन वरून वाऱ्यालाही मागे टाकेल अशा वेगाने लोकल निघाली ना, की तिच्या ' Not Listening' attitude कडे बघून असं वाटतं, खरंच काही नाही फरक पडत काहीही घडलं आयुष्यात तरी.. कितीही दुःख असलं तरी ! आपण ठामपणे पुढे जात राहायचं, जराही न डगमगता.. म्हणायला गेलं तर , आमच्याकडे पैसे फार नाहीत पण आजमितीला समाधान भरपूर आहे. जे आम्ही आमच्याकडे आलेल्या पाहुण्याला भरपूर देऊ शकतो. आम्ही त्या पाहुण्याला आमच्यातली ' मुंबई' देऊ शकतो !!"
तिनं दिलेला चहा आणि पोहे खाऊन मी बाहेर पडलो. कल्याण स्टेशन वर घुमत असलेला आवाज मी कानात साठवून घेतला..
" प्लॅटफॉर्म क्र. ३ वर आलेली लोकल पाच वाजून बत्तीस मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी बारा डब्यांची जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली, ठाणे, मुलुंड...................."
- आशुतोष पुरोहीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा