शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

चला जगूया.. !

 कंटाळा आलाय मला या खोट्या सलगीचा..

खोटं हसू, खोटा खेळ,
खोटा चेहरा, खोटा मेळ
"आहोत तसं" कधीच सादर होत नाही आपण लोकांसमोर..
त्यांच्या 'हवं नको' पणाचा विचार करतो , पण आपल्या नाही...
आपण काय चीझ असतो हे आपल्याशिवाय आणखी कोणालाच चांगलं माहिती नसतं.. पण एवढं मोकळेपणान बोलावं, अशा व्यक्ती भेटायला भाग्य लागतं..
रोज नवीन make up करून जातो आपण office ला.. हा make up powder चा रंगाचा नसतो.. हा असतो भावनांचा make up.. आपण जसे नाहीयोत तसं सतत दाखवत राहण्याचा make up.. निखळ पण उथळ हसऱ्या मुखवट्याचा make up..  मनात काहीही असलं तरी चेहऱ्यावर आपलं status दाखवणारा गंभीर   make up.. मनात जपलेल्या असतात एखाद्या साठी चार शिव्या, किंवा एखादीसाठी एक अलवार मिठी.. पण... make up बिघडेल ना !!!

आणि मग एखाद दिवशी हाच make up खूप भडक होतो.. आणि आणखीनच विद्रुप दिसायला लागतो आपण..!! म्हणजे सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात आपणच स्वतःला कुरूप करून घेतो..
मग कशाला करायची ही खोटी खटपट..? कशासाठी सारखं मनावर या "चांगुलपणाचा" किंवा "समजूतदारपणाचा" पट्टा लावून ठेवायचा..? कधीतरी तो तोडून सैरावैरा धावतच मन.. त्याचा स्वभावच आहे तो... काही नियम केला की आधी तो तोडण्याकडे कल..
छे! घरी आल्यावर म्हणूनच माणसं वैतागत असावीत बहुदा.. त्यांचा पट्टा गळून पडतो नं.. आता पुन्हा घरच्या वल्लींना सामोरं जाण्यासाठी पुन्हा make up चे थर लावण्याची energy नसते.. समोरच्याने आपल्याला आहोत तसं स्वीकारावं हीच साधी अपेक्षा असते.. दोन व्यक्तींमधल्या संवादापेक्षा त्यांचं एकमेकांना अनुभवणं, नात्याला अधिक बळ देऊन जातं.. आणि शांतीही...
पुन्हा उद्या सकाळी उठल्यापासून आपल्या भावनेचा पसारा आवरून office bag मध्ये शिस्तीत ठेवायचाच आहे... मग जिथे मी अस्ताव्यस्त असायला हवंय तिथे कशाला चौकटीचे लगाम ?
खरंच आहे.. आपण जगण्यासाठी मांडलेल्या खेळात इतके गुंतत जातो, की जगणंच विसरून जातो...
नाही ? तुम्हाला काय वाटतं..?

- आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा