ज्योत... फारसं लक्ष जात नाही आपलं आपल्या घरातल्या ज्योतीकडे.. मुळात देवाजवळ शांतपणे नतमस्तक होण्याचीच हल्लीच्या पिढीला गरज वाटेनाशी झालीये.. त्यामुळं, देवापुढली ज्योत अनुभवण्याची, तिच्या जवळ राहण्याची संधी हल्ली नाहीच मिळत कोणाला..
पण तरीही, जेव्हा केव्हा आपण देवापुढली ज्योत बघतो, तेव्हा तो प्रकाश आपल्या डोळ्यांना शांती आणि दिलासा देतो असा माझा तरी अनुभव आहे.. वारा आला की ती हलते, डगमगते जरा.. पण तिच्या मुळाशी असणारा तेलाचा स्नेह, तिला स्थिर राहण्याची ऊर्जा देत असावा...
कधीकधी असं वाटतं की ज्योत हे मायेचं प्रतिक आहे. कधीकधी वाटतं, ती स्थितप्रज्ञ आहे. घरात चालू असलेल्या सगळ्या गोष्टी ती किती शांतपणे पाहत असते!! त्यावर तिला तिची स्वतःची मतं नसतात का? की, तिला ती मांडायची नसतात..? छ्या:... काही कळेनासं झालंय... पण एक मात्र नक्की, त्या ज्योतीला आपण बोलकं केलं पाहिजे... तिने गप्पा मारायला हव्यात आपल्याशी... देवाच्या केवढी जवळ असते ती... तेही सतत..! कदाचित वशिला लागूनही जाईल आपला देवाकडे..!! 😉
पण खरंच, तीही आपल्याच घरातलीच आहे, या आपुलकीने तिनं बोललं पाहिजे..
इतक्यात घरातले lights गेले.. देवापुढली ज्योत एकटीच शांतपणे तेवत होती.. आता ती एकटीच अशी होती, जी मला त्या अंधारात वाट दाखवू शकणार होती..! मी तिच्याकडे पहिलं, ती गोड हसली... आणि, मी तिच्या प्रेमात पडलो... खरंच, अगदी मनापासून.. मी तिच्या जवळ गेलो.. पाहिलं.., तिचं मूळ तेलात भिजवलं होतं.. तिथे प्रेम होतं, माया होती, स्नेह होता.. थोडक्यात काय..? तर, सारं 'मातृत्व' तिथं अक्षरश: एकवटलं होतं..!!
तिचं शरीर.. ते कापसाचं होतं.. त्यात मार्दवता होती.. आणि तिचा चेहरा...! तो तर तेजाने लखलखत होता..! प्रसन्नता ओसंडून वाहत होती तिथं..!
मला खूप आनंद झाला.. कारण आता ती माझ्याशी बोलली होती.. ती काय आहे हे मला आता कळलं होतं..! चटकन वही आणि पेन घेऊन लिहायला बसलो...
"प्रकाश" अर्थात, तिचाच होता...!!!
-आशुतोष पुरोहित😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा