शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते...

 तिने अमृतांजन ची डबी बंद करून उशाशी ठेवली. उशीवर डोकं ठेवल्यावर तिला जरा बरं वाटलं. शरीरासोबतच दिवसभराचं दमलेलं मनही तिनं तिथंच थोडं हलकं केलं.


-------------

"मी कवितेची वाट पाहतो, माझ्या नकळत..

अकल्पितातून येते कविता, तिच्याही नकळत.."

सुधीर मोघेंचा कवितांचा कार्यक्रम चालू होता. ती एकीकडे भराभर तिला भावलेल्या ओळी note down करून घेत होती. 

" लय एक हुंगली, खोल खोल श्वासात..

ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात..

लगडाला वेल तो पहा निघाला गगनी..

अन् देठांना फुटल्या, कविता पानोपानी.. !! "

कार्यक्रम संपला.. घाईघाईने ती आईसोबत घरी निघाली.. कारण मोघेंकाकांच्या बहारदार कविता ऐकल्यामुळं तिलाही एक कविता 'होत' होती. तिची गंमत म्हणजे, स्फुरलेली कुठलीही नवी कविता ती तिच्या 'कवितांच्या वही'तच लिहीत असे. तिनं जपलेली ही वही, फक्त वही नव्हती.. त्यात मूर्तिमंत 'ती' भरलेली होती..! तिची सगळी सुख-दुःख ती या वहीपाशी मोकळी करायची.. 

ती एक कविता किती गोड होती ना..

'एक होती बंडी, तिला वाजली थंडी..

तिनं घातला स्वेटर, चालवू लागली मोटर..' 

ह:.. काहीही लिहायचो नाही आपण..


तिनं कूस बदलली.. 

ती कवितांची वही.. त्या कविता.. अंशाअंशाने का होईना समृद्ध करायच्या आपल्याला.. अपल्यातलं वेगळेपण दाखवून द्यायच्या.. आपल्याला स्वत:जवळ न्यायच्या..


....आत्ताही तिला अशाच एका वहीची गरज होती...थोडं स्वतःजवळ जाण्यासाठी... 


माझी वही... काय करत असेल ती सध्या...?


-आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा