आपण त्या दिवशी नेहमीसारखेच collegeला जातो. थोडे वैतागलेले, थोडे कावलेले.. पार्किंगला कुठं जागा मिळत्ये का, या शोधात असतो. इतक्यात बाजूनं काही मुलींचा घोळका जातो.. हसत, खिदळत, केस सावरत.. त्यातल्या तशा ३-४ मुली 'बऱ्यापैकी' असतात.. पण एखादाच असा चेहरा असतो, जो आपली नजर खिळवून ठेवतो.. हृदयात वाजे something सुरु होतं.. खरंतर मनात एक अक्षरही उमटत नाही.. असते ती फक्त एक स्वाभाविक प्रतिक्रिया.. केवळ 'भाव' असतो कसलातरी.. बहुधा 'ती'च्या प्र-'भावा'चा असावा.. झालं.. दिवसाच्या सुरुवातीलाच आपली कुणीतरी अशी विकेट घेतं.. दिवस हळूहळू पुढे जात असतो.. assignmentsचं tension, शिक्षकांची बोलणी, मित्रांची मस्ती.. सगळं चालू असतं.. मधून मधून 'ती' ची सुखद आठवण मनाला होत राहत असते.. मधाचं बोट लावल्यासारखी.. त्या दिवासापुरती 'ती' आपल्यासाठी 'Drive for work' असते..
आणि अचानक असं काहीतरी घडतं ज्यामुळे आपला खूप मोठा मूड ऑफ होतो.. मूड ऑफ कसला.. कोसळतोच आपण आतून.. मोठमोठ्याने भोकाड पसरावंसं वाटतं.. 'हे काय चाललंय आयुष्यात?, सोडून देऊया सगळं' असे विचार मनात यायला लागतात.. आपल्याला रडू येतंय हे जगजाहीर होऊ नये म्हणून आपण कुठल्यातरी झाडाच्या मागे, कॉलेज कडे पाठ करून उभे राहतो आणि झोकून देतो स्वतःला.. मनसोक्त रडतो.. इतक्यात मागून काही मुलांचे आवाज यायला लागतात.. आपण जरा डोकावून बघतो.. तीच सकाळची मुलगी तिथं मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारत उभी असते..
"जाऊन बोलूया का तिच्याशी? काढूया का ओळख ?.. पण अशा अवस्थेत..? नको नको.. जाऊ दे.."
आपण घरी येतो.. आता आपला मूड बऱ्यापैकी सुधारलेला असतो.. शांतपणे बसून कॉफी पित असताना, पुन्हा 'ती' आठवते.. चेहऱ्यावर अलगद हसू फुटतं..
आपण स्वतःशीच बोलायला लागतो..
"खरंच गरज आहे का तिच्याशी बोलण्याची..? ती आपल्या मनात आहे तशीच खूप सुंदर आहे.. प्रत्येक वेळी तिला आपल्या आयुष्यात 'आणण्याची' गरज काय ? असं म्हणतात, फूल हे झाडावरतीच खूप छान दिसतं.. तसंच तिला अलिप्तपणे अनुभवण्यातच खरी मजा आहे, नाही ? स्वप्न सत्यात येऊ लागलं की complications पण वाढतात खूप.. आपण कोणी नाही तिचे, पण ती आपल्यासाठी एक खूप सुंदर 'drive for work'च राहिली तरी काय हरकत आहे ? तिला असं अनुभवण्यातच खूप सुख आहे.."
आपण कॉफीचा मग ठेवून देतो...
'ती सध्या काय करते..?' हा प्रश्न मनाशी जपून ठेवत पुढच्या कामाला निघून जातो...!!
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा