शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

मग्न तळ्याकाठी...

 ती लेखणी हातात घेते. लेखणी कागदावर उतरल्या उतरल्या, तिचं मन ओसंडू लागतं त्या पत्रातून...


प्रिय नवरा,

प्रियकराचा नवरा झाल्यावर आणि प्रेयसीची बायको झाल्यावर प्रेम कमी होतं का ?
एकमेकांना अती ओळखलंय बहुतेक आपण.. पूर्वी तू मुकेपणीही बोलायचास माझ्याशी. हल्ली तू बोललेलं कळतं, समजतं, पण रूजतंच नाही रे आत. पूर्वी आपण एकमेकांच्या मनात डोकावायला उत्सुक असायचो. आणि आता...
समोरच्याने मनात डोकावलं तरी आपला mood खराब, आणि नाही डोकावलं तरी खराब...
संसार जुना झाला की, लग्न इतकं सुकतं का रे ?

माझा पदर तुझ्या शेल्याला बांधला, तेव्हा आपल्यातल्या प्रेमापोटी गाठ पक्की झाली, पण आता फक्त ती गाठ आहे, "म्हणून" आपण आहोत का ?
बोल ना.. तू असा गप्प नको ना राहूस..
आपल्याला एकमेकांच्या अनेक गोष्टी अनेक वेळा खटकतात.. पण नाही बोलत आपण कधीच, कारण भांडणं नको असतात आपल्याला.. का ? का नको असतात भांडणं ?
"आपल्याला" त्रास होतो म्हणून !! खूप आत्मकेंद्री झालोयत ना रे आपण ? हो.. आत्मकेंद्री झालोयत.. पूर्वी असे नव्हतो आपण.. आपल्याला कितीही त्रास झाला, तरी आपल्यातला कोणीतरी एक मनात अढी ठेवून गप्प असेल, तर लगेच बोलून मोकळे व्हायचो आपण.. झरा वाहता राहायचा.. आता त्याचं 'तळं' झालंय.. 'स्वमग्न' तळं !
नाही नाही ! हे असं नाही होता कामा.. आपण खरंच नव्हतो आधी असे..
मी तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहे... पण तू please माझ्यापासून लांब जाऊ नकोस. मला तू हवायस... I love you.. खरंच..

( खऱ्याखुर्या स्वेच्छेने ) 'तुझीच',
बायको.

ता.क. -

सारे काही बोलून गेले, मी प्रेमापोटी...!
इतके सारे साचत होते, मग्न तळ्याकाठी...!!!

लेखणी थांबली. विचार थांबले.
आता ते 'तळं' रितं झालं होतं !
ती तळ्याकाठी उभी होती.. !!
त्याची वाट बघत....

'तोही येईल !
नक्की येईल !!' तिचं मन म्हणत होतं....

दुरुन पावलांचा आवाज यायला सुरुवात झाली होती...!!

-आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा