शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते....

 त्याने signal पाशी गाडी थांबवली. Steering wheel वर बोटाने ताल धरत तो तिला शोधत होता... 

" काय सुंदर असतात तिच्याकडचे गजरे..! ताजेतवाने ! पण आज कुठे गेल्ये ही? खरंच काय आयुष्य ना या लोकांचं.. दिवस-रात्र, ऊन-पाऊस, कसलीही पर्वा न करता आपलं काम करत राहायचं.. काही लोक तर कारची काच खाली घेण्याचेही कष्ट घेत नाहीत यांच्यासाठी.. हा असा अपमान सहन करण्याची शक्ती येते कुठून यांच्यात..?" 


तिच्याकडून गजरे घेण्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पहायला जास्त आवडायचं त्याला.. ७-८वीत असेल चिमुरडी.. ती हसताना तिचा एक तुटलेला दात लख्खकन चमकायचा, चांदणीसारखा.. दिवसभराचा सगळा शिणवटा निघून जायचा त्याचा, तिला पाहिलं की.. 

पण आज......?

ते दुसरीकडे राहायला गेले असतील का?

... की तिला कोणीतरी पळवून...

नको नको. असले विचारच नको करायला.. 

सिग्नल सुटला. घरी येईपर्यंत तो तिचाच विचार करत होता.. 


" Sorry हा.. मी म्हटलं होतं पण नाही आणला गजरा.. अगं आपली नेहमीची गजरेवाली मुलगीच नव्हती आज तिथे.." तो तिच्या हातात डबा देत म्हणाला.. 


"लग्न झालं तिचं.... 

तिची आई आपल्या नाक्यावर फळं विकायला बसते, ती सांगत होती आज मला.." डोळे भरून येतील असं वाटलं म्हणून झटकन तिने त्याच्या हातातला डबा घेतला आणि स्वयंपाकघराकडे वळली.. 


" मी गजरा आणलाय येताना वेगळीकडून.. हात पाय धुवून देवाला वाहून घे.."  जरा हललेल्या स्वरात ती म्हणाली..


तो काही काळ तिथेच स्तब्ध उभा होता.. 

'ती सध्या काय करते...?' हा प्रश्न देवाला विचारत होता...


- आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा