शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते....

 आपल्या प्रत्येकाच्या मनात आठवणीचा असा एक कोपरा असतो, जो फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती असतो.. त्याला कोणीही 'sharer' नसतं.. आपल्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग, एखादी जागा, एखादा माणूस... मनाच्या 'त्या' कोपऱ्यात, तो फक्त 'आपला' असतो.. ती जागा, ते प्रसंग, ती माणसं बाकीच्या लोकांना माहितीही असतील, पण आपल्या मनात मात्र ती 'आठवण' बनून राहिलेली असतात.. 

खरंच.. एखाद्याची 'आठवण' बनणं किती सुंदर असतं ना..! 

ती त्याची अगदी 'स्वतःची' अशी place असते.. खरंतर ती त्याची खरी "ती" असते...!



कुठल्यातरी निवांत संध्याकाळी मग आपण या आठवणींशी गप्पा मारायला लागतो...  "ती" सध्या काय करते... हे जाणून घ्यायला लागतो.. आपल्या आठवणींचा आपणच शोध घेऊ लागतो.. 

अशा वेळी सहजच आपल्या मनात येतं, 

"त्या आठवणीलाही माझी आठवण येत असेल का...?"


किती प्रेम असतं ना आपलं आपल्या आठवणींवर.. एस टी च्या खिडकीत बसून बाहेरचा निसर्ग अनुभवताना, एकटंच two wheeler वरून शांत रस्त्यावरून जात असताना, किंवा एखाद्या निवांत बागेतून एकटंच चालत फिरताना या आठ्वणींचीच तर सोबत असते आपल्याला.. अशा वेळी त्यांना आपण आंजारतो, गोंजारतो, त्यांचे लाड पुरवतो, आणि एकीकडे त्यांना घडावतोही.. 

एखाद्या कुपीतून अत्तराचा सुगंध यावा, तशा या आठवणी मग स्वतःहूनच आपल्याशी बोलू लागतात.. स्वतःला उलगडून दाखवू लागतात.. आपल्या मनाशी गप्पा मारू लागतात.. आणि मग यातूनच अगदी आपली स्वतःची अशी "आठवणींची गोष्ट" तयार होते.. 

असं म्हणतात कि, 'everyone has a story'.. कुठनं तयार होते हो ही story?? जेव्हा आपल्या आठवणींचं आपल्या कल्पनांशी मिलन होतं ना, तेव्हा त्यांची एक गोष्ट तयार होते.. "ती सध्या काय करते..?" हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो, कारण आपल्यातल्या प्रत्येकाला स्वतःची अशी एक 'गोष्ट' असते...!! एक अनकही, अनसुनी गोष्ट..! 

आणि मग ही गोष्टच 'आपल्याला' घडवू लागते..!

काय गंमत आहे ना.. आधी आपण गोष्टीला घडवायचं , आकार द्यायचा, आणि मग ती आपल्याला घडवणार..! 

आपलं असणं, आपलं व्यक्त होणं सगळं सगळं ही गोष्टच  घडवत असते.. 


स्वतःलाच विचारू लागतो....


कुठे असेल ती... काय करत असेल ती सध्या...? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा