two wheeler ने घरी येत होतो. पलिकडच्या रस्त्यावरून bus जाताना दिसली. 55 नंबर suncity.. कोणे एके काळी मीही याच bus ने घरी यायचो. तेव्हाच्या अनेक गोष्टी, bus मधल्या अनेक घडामोडी एखाद्या short film सारख्या 2 मिनिटात डोळ्यांसमोरून चमकून गेल्या. रात्रीचे 10 वाजायचे तेव्हा घरी यायला.. खूप किचाट गर्दी असायची.. धड उभं राहायलाही जागा नाही..
खरं सांगू ? गर्दी फक्त माणसांचीच नसायची..
प्रत्येक माणसाच्या आतली ओढाताण, तो सोसत असलेले कष्ट, त्याची दमणूक, त्याच्यावरचं अपेक्षांचं न दिसणारं ओझं या गोष्टी तिथे "गर्दी" व्हायच्या...
कोणी, आधारासाठी खांब धरायची धडपड करत असतं..
कोणी, मिळालेला खांब जिद्दीनं घट्ट पकडून ठेवण्याच्या धडपडीत असतं.. कोणी नुकतंच चढलेलं असल्यामुळे, पायरीजवळचीच काही इंचांची जागा गोड मानून घेतं..
कोणी खिडकीजवळ बसलेलं असतं.. खिडकीच्या बारला त्यांचं डोकं अलगद टेकलेलं असतं.. डोळे आपसुकच मिटतात.. चेहऱ्यावरचे श्रम हळुवार विरून जातात.. समोरून येणारा भणभण वारा त्या चेहऱ्यावर स्मित पांघरून पुढे जातो.. त्या माणसाला त्या गर्दीची झळ पोहोचत नाही.. त्याचं आकाश निरभ्र असतं.. अगदी मोकळं... तो गर्दीत असून 'गर्दीचा' उरलेला नसतो.. पण हे भाग्य मिळवायला पूर्व पुण्याई खूप पाहिजे !!
तसलं भाग्य फार कमी वेळा माझ्या वाट्याला आलं..!
मी bus मधे चढून खिडकीजवळ जायच्या धडपडीतच उतरायची वेळ झालेली असायची..
पण त्या bus मधून जाण्यात एक अपूर्वाई होती.. नवनवीन प्रकारची माणसं नजरेस पडायची.. नव्या भाषा, नवे ढंग, नवी आब, नवी ढब, नवे सूर, नवे नूर.. खूप काही नवं.. आपल्या चौकटीपल्याडचं..
आपल्यातलंच, आपल्याला न दिसलेलं विश्व त्या गर्दीत गवसायचं... !!
आता ते सगळं मी कुठेतरी miss करतो...
खरं सांगतो, त्या bus च्या गर्दीत जो comfort होता, तो या two wheeler वरच्या एकटे पणात नाही..
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा