त्या दिवशी संध्याकाळी नेहमीसारखीच ट्रेफिक होती रस्त्यावर.. कोपर्यावरच्या चहाच्या टपरी वर, "ये कागज की कष्टी, ये बारिश का पानी" गाणं लागलं होतं.. अचानक ढगांनी आभाळात गर्दी केली.. अगदी सिग्नल लालाचा हिरवा होण्याचीही वाट पाहिली नाही..! उतावीळासारखी लगेच बरसायला सुरुवात.. लगेच कारच्या काचांचे वायपर्स सुरु झाले.. टू-व्हीलर वर असणाऱ्यांच्या छ्त्र्या उघडल्या.. रस्त्यावर चालणारे आडोसा शोधायला लागले.. पाखरं झाडाच्या पानांची छत्री करून त्यात बसली.. रस्त्यावरची मातीही चिखल होऊन वाहती झाली.. आम्ही भावंडं लहान होतो ना, तेव्हा या चिखलाच्या पाण्यात उड्या मारायला जाम मजा यायची... त्यावेळी आई-बाप आम्हाला कडेवर घेऊनच धंदा करायचे...
एरवी भीक मागताना आईच्या डोळ्यात पाणी यायचं. पण पावसाळ्यात ते आलं तरी , आम्हाला कोणाला दिसायचं नाही... म्हणून मला लहानपणापासून पाऊस आवडला फार.. माझ्या आईचं रडू एका अर्थाने पोटात घेणारा..! नंतर आम्ही मोठे झालो, मग आई-बापानं आम्हालाही धंद्याला लावलं..
पण त्या दिवशी मात्र तो पाऊस आणि 'ये कागज की कष्टी' गाणं.. बरोबर जोडी जमली होती.. मला माझं पावसातलं लहानपण आठवून गेलं, त्या गाण्यामुळे.. लहानपणी ना, आम्ही कडेवर असताना आई तिच्या फाटक्या पदराने डोकं झाकायची आमचं. पाऊस लागू नये म्हणून.. आईचा तो फाटका पदर हीच छत्री होती आमच्यासाठी तेव्हा.. ती सगळ्यात सुरक्षित छत्री होती माझ्यासाठी.. फाटकी असली तरीही..
तेव्हा मी रस्त्यावरच्या बाकीच्या लोकांकडे बघायचो.. सगळे जण छत्र्या, रेनकोट घालून फिरत असायचे..
पण माझ्याइतकी श्रीमंत छत्री कोणाकडेच नसायची..!
आईच्या पदराची...
माझी फाटकी छत्री...
आणि तिच्यातून आत झिरपणारा..
माझ्या छत्रीचा पाऊस....!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा