मी फार पटकन निराश होतो. एवढ्या-तेवढ्यावरून खूप पटकन mood जातो माझा...
परवाच एक नवीन सॉफ्टवेअर शिकत होतो. मी योग्य ते इनपुट देऊन सुद्धा हवं ते आउटपुट मला मिळत नव्हतं..
"शी: यार.. काये हे... आपल्याच्यानं हे होणारच नाही.. जाऊ दे.. जमणारच नाहीये आपल्याला हे कधी.." असले अनेक विचार मनात येऊ लागले..
अचानक मन मागं गेलं..
स्थळ... हेमराजवाडी, गिरगाव.. माझ्या मावशीचं घर.. मे महिन्याच्या सुट्ट्यांचा काळ... संध्याकाळची वेळ..
आम्ही तिघं- मी, अमोघदादा आणि उमाताई काहीतरी खेळत असायचो.. प्रज्ञा मावशी दवाखान्यात गेलेली असायची आणि अतुल काका पलीकडच्या खोलीत काहीतरी काम करत असायचा.. थोडक्यात, संध्याकाळच्या वेळी निळ्या खोलीत आम्हा तिघांचं राज्य असायचं.. मग खेळता खेळता भांडणं व्हायची.. त्यातल्या त्यात अमोघदादा आणि उमाताई यांच्यात भांडण होणार हे ठरलेलं ! म्हणजे, त्यांच्यात एकदातरी भांडण झाल्याशिवाय खेळ पूर्ण झालाय असं वाटायचंच नाही.. अबोला धरण्यापासून ते मारामारी करण्यापर्यंत सगळे विधी यथासांग पार पडले की मग, अगदी भांडण सोडवायला आल्यासारखी प्रज्ञामावशी यायची.. ती आली, आणि आम्ही तिघांनी हे असलं काहीतरी करून ठेवलेलं असलं, की एक विलक्षण शांतता पसरायची.. ती शांतता अजूनही लक्षात आहे माझ्या.. फिर्याद प्रज्ञामावशीपर्यंत पोहोचली, की मग ती आम्हा तिघांना समजावायला यायची..
"इतक्या पटकन mood नाही घालवायचा बाबा अमोघ... आणि उमा खेळात असं होणारच... कोणी हरणार, कोणी जिंकणार.. पुन्हा डाव मांडायचा.. एवढ्यातेवढ्यावरून भांडणं करून तोंडं एवढीशी करून बसलात तर कसं होईल ? झालं मे महिना संपला, आशुतोष पुण्याला गेला की आहेच आपापला अभ्यास आणि शाळा.. मग कुठे पुन्हा वेळ मिळणारे तुम्हाला ? तिघंही लहान आहात, त्यामुळे तिघांनी एकमेकांना समजून घ्यायचं.. 'आपलाच भाऊ आहे, आपलीच बहीण आहे' असं म्हणायचं आणि पुन्हा एकत्र यायचं... भांडायचं नाही सारखं..." तिची सगळी वाक्यं पाठ केलेल्या script सारखी जशीच्या तशी डोक्यात आहेत.. खूप सोप्पं सांगायची ती... खूप साधी तत्वं सहज सांगून जायची... आयुष्यात वावरताना हीच तर तत्वं लक्षात ठेवायची असतात ! पण माणूस "मोठा" होतो, आणि बालपणाबरोबरच तेव्हाचे संस्कारही टाकून देतो ! अनेकदा "आपण मोठे झालोय" ही जबाबदारीच मन आखूड बनवते...
आता हेच बघा ना ! आत्ताचं हे सॉफ्टवेअर शिकताना किती पटकन mood गेला माझा.. तेव्हा मावशीची वाक्य आठवली...
"इतक्या पटकन mood नाही काही घालवायचा.. खेळात असं होणारच... कोणी हरणार, कोणी जिंकणार.. पुन्हा डाव मांडायचा.. एवढ्यातेवढ्यावरून तोंडं एवढीशी करून बसलात तर कसं होईल ?"...
इतक्या साध्या वाक्यांनी गेलेला mood परत आला, की "आपण खरंच मोठे झालोय का ?" असा प्रश्न पडल्याशिवाय राहवत नाही.
अशा वेळी खरंच म्हणावसं वाटतं...
"कोई लौटा दो मुझे बीते हुए दिन...."
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा