शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

आयुष्याचा सूर

 ६:३२ ची लोकल तिसऱ्या प्लॅटफॉर्मला आली...

मी शबनम सांभाळत आत शिरलो..
"काय साला गर्दी.. कपाळावरचा घाम पुसायला हातसुद्धा कपाळापर्यंत नेता येत नाहीत.." मी नेहमीप्रमाणं गर्दीवर वैतागत होतो..
"आमच्या फास्ट लोकलचं नुसतं नाव फास्ट.. आता इतका वेळ कशाला थांबल्ये ही इथे ?" मी लोकल वर चिडलो..
अखेर लोकल ने स्टेशन सोडलं आणि एक गार वाऱ्याची झुळूक त्या गर्दीतून वाट काढत माझ्यापर्यंत आली.. बरं वाटलं..
"पण या नुसत्या एका झुळुकेने काय दिवसभराचा शीण जाणार आहे ?" मी त्या झुळुकेवरही वैतागलो..
घाटकोपर स्टेशन गेलं आणि लोकं आता जरा स्थिरावली..  म्हणजे आत्तापर्यंत चवड्यांवर उभी होती, ती पावलं आता पूर्ण टेकती झाली.. ठाणे यायला अजून अवकाश होता..
इतक्यात मागून कुठूनतरी भजनांचा आवाज ऐकू आला.. मागे वळून पाहिलं, तर खिडकी पाशी बसलेली लोकं, भिंतीवर ताल धरत भजनं म्हणत होती..
ते माझं आवडतं भजन होतं..
"राधे-कृष्ण-हरी, मुकुंद मुरारी.."
अहाहा.. काय सूर होता.. जगात कसली चिंताच नाहीये असा फील आणत होता तो सूर मला.. केवळ भक्तिमय आनंद दाटून आला होता तिथे.. मग ती गर्दीही मला फारशी conjusted वाटली नाही..! गर्दीतून थोडा सरकत सरकत मी त्या भजन करणाऱ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.. आता तर त्यांच्या सुरांमधले बारकावेही ऐकू येऊ लागले होते.. 'राधे कृष्ण हरी' मधल्या "राधे"चा सूर उच्चारताना त्या माणसाचा आवाज काय फिरत होता ! वा ! जणू राधाकृष्ण उभे राहिले डोळ्यांसमोर...
त्या मंडळींना कुठे उतरायचं होतं देव जाणे ! पण चढणाऱ्या-उतरणाऱ्यांची मनं एकदम प्रसन्न करून सोडत होते ते...
बास ! या फिलिंग मधून बाहेरच पडू नये असं वाटत होतं आता मला.. मग ही गर्दी, फास्ट लोकलचं उशिरा येणं, स्लो चालणं, सगळं माफ.. पण हे सूर हवेत आयुष्यात...
असं सगळं स्वप्नमय चालू असतानाच खास मुंबईचा ठेवणीतला आवाज कानावर आला...

"पुढील स्टेशन... ठाणे..."
"कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतराकडे लक्ष द्या.. "
"अगला स्टेशन.. ठाणे.."

मी पुन्हा भानावर आलो.. कारण आता पुन्हा एक गर्दीचा महाप्रचंड लोंढा आत शिरणार होता.. त्याला तोंड द्यायला सज्ज झालो.. पण आता ती गर्दी नकोशी वाटत नव्हती, पूर्वी इतकी..
कदाचित त्या भजनामुळे असेल किंवा काय, माहिती नाही...

पण एक मात्र कळलं..
लोकल ला नसला तर नसू दे, पण आपल्या आयुष्याला सूर हवा एवढं निश्चित...

-आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा