एका टुमदार बंगल्याचं काळंकुट्ट फाटक... मी फाटक ढकलून आत गेलो. फाटक ढकलल्यामुळे त्यावर विसावलेल्या फांद्यांना जरा धक्का लागला. झोपलेल्या माणसाला जर आपला चुकून धक्का लागला, तर तो कसा त्याच्याच नकळत काहीबाही हालचाली करतो आणि कूस बदलून झोपतो; तसंच त्या फांद्यांचं झालं असावं !
त्या फांद्यांनी त्यांच्या पानांत उन्हांचे गजरे माळले होते जणू !! इतकं सुंदर दिसत होतं ते सगळंच..!
आपलीच दृष्ट लागू नये, म्हणून त्या फांद्यांना मी तसंच तिथे निवांत पडू दिलं आणि बंगल्याच्या दाराजवळ आलो.
बेल वाजवणार, इतक्यात मला प्राजक्ताच्या फुलांचा वास आला. माझ्या डोळ्यांसमोर साहजिकच प्राजक्ताचा सडा उभा राहिला. वासाच्या दिशेनं पावलं टाकायला लागलो. बंगल्याच्या उजव्याच बाजूला त्या सड्याचं मला दर्शन झालं... अहाहा !!
तो सडा इतका सुंदर दिसत होता, की 'प्राजक्ता'वर ऐकलेल्या सगळ्या कविता मला क्षणार्धात गद्य वाटू लागल्या !!! विश्वातलं सगळं गेय या निसर्गातच सामावलंय याची जाणीव झाली.
एक एक प्राजक्ताचं फूल एकेका चांदणीइतकंच देखणं होतं.
मी या सृष्टिसौँदर्यात पार विरघून गेलेलो असतानाच, पाठीमागून मला काकाची हाक आली. त्याच्याच बंगला होता तो. मला अंगणात पाहून त्याला साहजिकच आश्चर्य वाटलं असणार..
आम्ही घरात गेलो. मी चपला बाहेर काढून घरात पाऊल टाकलं आणि तेवढ्यात माझा छोटा चुलतभाऊ खेळत असलेली छोटी खेळण्यातली गाडी पायाला येऊन धडकली. जवळजवळ घरभर, त्याच्या खेळण्यांचा पसारा झाला होता. माझ्या काकाने, तो कसाबसा सावरला, आणि आम्ही दोघं बसलो.
खेळणी.. खेळणी..
गप्पाटप्पा झाल्या, चहापान झालं, पण खेळणी हा शब्द काही डोक्यातून जात नव्हता... असं का होतंय कळत नव्हतं.. शेवटी 'खेळणं' म्हणजे काय ? मनाचा विरंगुळा.. लहान मुलं आपला आनंद, या छोट्या-छोट्या गाड्यांमधे, खोट्या-खोट्या प्राण्यांमधे शोधत असतात. म्हणूनच तर त्यांना खेळणी म्हणतात...!
पण.... मोठ्या माणसांचीही अशी काही खेळणी असतील का? डोक्यात एकदम विचार चमकून गेला..
तेवढ्यातच माझी निघायची वेळ झाली होती. काका-काकूला 'बाय-बाय' केलं आणि बाहेर काढून ठेवलेल्या चपला पुन्हा अडकवल्या. पुन्हा तोच प्राजक्ताचा सुवास...! आणि मला कळलं....!
तो प्राजक्ताचा सडा हे एका अर्थाने माझं खेळणंच होतं की..! मनाचा विरंगुळा..! त्रास, ताप, भीती, काळजी, कंटाळा कोणाला चुकलाय ? पण हे सगळं असूनही, ज्या गोष्टी, हे विसरायला लावतात, ती खरी 'खेळणी'..!
शांतपणे फाटकाच्या दिशेने चालू लागलो. खरंतर माझं खेळणं तिथेच सोडून मी निघालो होतो. छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद घेणं, हेच खरं आयुष्य आहे हेही खरंच... पण मला असं वाटतं, ती गोष्ट वेळ आल्यावर तिथेच सोडून देऊन, नवा आनंद शोधायला निघणं ही त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे...!
फाटक उघडताना, मी पुन्हा त्या फांद्यांची झोपमोड करणार आहे, हे माझ्या लक्षात येत होतं, तरी मी ते केलं.
आणि मी घराच्या दिशेनं चालू लागलो...
सुगंध, फाटकाच्या आत दरवळतच होता...!!!
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा