चालताना एकमेकांच्या हातांचा स्पर्श होतोच नकळत...
तरी मी सावधपणे हात आखडून चालतो.... पण घडी घालून चालणं काहीतरीच दिसतं, म्हणून खालीच सोडावे लागतात हात... आणि मग ते मुजोर, एका बेसावध क्षणी स्पर्श करतात तुझ्या बोटांना..
तो स्पर्श जाणवलेला असतो दोघांनाही खरंतर... पण मुद्दाम आपण "काहीच झालेलं नाही" अशा अविर्भावात चालत राहतो... पुन्हा पुन्हा तो वेडा स्पर्श अनुभवण्यासाठी...
हळूहळू रेंगाळतात एकमेकांची बोटं एकमेकांपाशी जास्त वेळ....
मग बऱ्याचदा तूच पुढाकार घेतेस आणि गुंतवतेस स्वतःला माझ्यात... तुझ्या हाताच्या रूपाने....!
ही बोटं अशी गुंफली ना एकमेकांत, की त्यांची रचना पाहिली तर एकाआड एक बोटं येतात आपली.. म्हणजे आधी तुझं बोट असेल तर त्यानंतरचं बोट हे माझं असतं... पुन्हा तुझं, मग माझं...
असे जेव्हा दोघं एक होतात, तेव्हा त्याला एक सामर्थ्य प्राप्त होतं... एकत्वाचं !
सुखी संसार हा असाच पूर्णत्वाला जात असावा.. नाही का?
हातांच्या रूपाने एकत्र आलेली मनं आणि गुंफलेल्या बोटांच्या रूपाने एक झालेल्या वृत्ती हेच संसाराला एक भक्कम आधार देऊ शकतात...
पण त्यासाठी सुरुवातीचा खुळा स्पर्श आपला मानून घ्यायला हवा... तरंच "संसाराच्या" हातात "सुखाचा" हात येईल...
नाहीतर नुसते नावाला एकाचे दोन हात करून करायचंय काय !!!
- Written by 'तोषा...'
( Ashutosh Amod Purohit )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा