तो : चार वर्षांपूर्वी इथेच propose केलं होतं मी तुला..
ती : आठवतंय..
तो : मोकळी झाली होतीस तेव्हाच माझ्यापाशी सगळंच बोलून..
ती : hmm... तेव्हा सगळं छान वाटतं.. नंतर त्याचे परिणाम दिसून येतात..
तो : तू कशाला त्याची काळजी करतेस ? मी आहे ना तुझ्याबरोबर ?
ती : माझ्याबरोबर नाही.. माझ्या आत असतोस तू.. सतत वाजत असतोस आतमध्ये ! तुझा सूर, तुझा ठेका.. तुझं गाणं.. सतत साथीला असतं माझ्या..
तो : इतकं प्रेम करतेस माझ्यावर ?
ती : ( काही बोलत नाही )
तो : काय गं ?
ती : भीती वाटते..
तो : कसली ?
ती : आपण जसे आहोत तसं मान्य करण्याची..
तो : ( हसतो ) ते तर प्रत्येकालाच जड जातं..
ती : पण प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखी नसते..
तो : किनाऱ्यावर आलेला प्रत्येक जण हेच म्हणतो मला.. प्रत्येकाला स्वतःचंच रडगाणं इतरांपेक्षा अधिक दुःखद वाटतं.. !
ती : मग तू काय करतोस ?
तो : ऐकून घेतो सगळ्यांचं सगळं शांतपणे.. माझ्याजवळ ऐकवायला माझ्या गाजेव्यतिरिक्त आणखी काहीही नसतं.. पण तेवढीच ऐकून खूष होतो प्रत्येक जीव.. तुझ्यासारखा !
तुला एक विचारू ?
ती : बोल ना..
तो : 'तो ' अजूनही काही बोलत नाही ?
ती : ( उदास हसत ) वेळ कुठे असतो त्याला ? अात्ताही बघ.. शेजारी-शेजारी बसलोय आम्ही.. अगदी तुझ्यासमोर ! त्याला कळतही नाहीये.. मी तुझ्याशी बोलत्ये ते..
तो : तुला तरी कुठं कळतंय ??
ती : काय ?
तो : ..... की तुझा 'तो'ही माझ्याशी काहीतरी बोलतोय ते.....!!!
( ती समुद्राला विचारत राहते.. समुद्र, त्याची गाज गात राहतो, तिच्याच आत !
अर्थात्, त्याच्यापाशी तरी दुसरं काय होतं म्हणा !! )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा