रविवार, ११ जून, २०२३

पालवी

 ती : हेलो 

तो : हेलो...
ती : ( थोडा pause ) बोल..
तो : आवाज ओळखलास माझा !
ती : काही राग आपण नाकारले असले तरी, आपले हट्टी कान मात्र तेच सूर धरून बसलेले असतात... म्हणून ओळखू आला आवाज...
तो : बर 
ती : phone कशासाठी केलायस?
तो : एक विचारायचं होतं...
ती : काय ?
तो : एकदा घरी येउन जाशील ?
ती : ( pause ) का ? आता काय उरलंय माझं तिकडे ?
तो : नाही काहीच नाही.. कपडेलत्त्यापासून भांडीकुंडयांपर्यंत जे जे काही 'तुझं' होतं, ते सगळंच घेऊन गेलीएस तू.. मला तुझी आठवण यावी, असं काहीच उरलं नाहीये आता घरात... फक्त एकंच request होती...
तू गेल्यापासून, माझी बासरी सुरात वाजतंच नाहीये. तिला तेव्हढा सूर लावून जाशील ? 
बरेच दिवस झाले, तुळशी वृंदावन सुकलंय अंगणातलं.. खरंतर रोज पाणी घालतो मी.. तरीही.. त्याला तेव्हढं  पाणी देऊन जाशील? स्वयंपाकघरातल्या शेगडीवरच्या अन्नाची चव हरवल्ये बघ.. त्यात तेव्हढी चव पेरून जाशील? 
माझ्यासाठी नको , पण ह्या गणगोतांसाठी... एकदा घरी येशील ?
हेलो... हेलो ....

( तिकडचा phone  केव्हाच cut  झालेला असतो.. तो निराश होऊन टेबलवर डोकं टेकवतो. कधी डोळा लागतो, त्याच त्याला कळत नाही. 
थोड्या वेळाने त्याला जाग येते... तेव्हा दारावरची बेल वाजत असते... 
तो झटकन उठून दार उघडायला धावतो.
 दार उघडतो आणि पहातच राहतो.. 

वृंदावनाताल्या तुळशीला नवी पालवी फुटत असते...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा