शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

संध्याकाळ

 दिवसभरातली माझी सगळ्यात आवडती वेळ म्हणजे संध्याकाळ ! संध्याकाळी दिवसाचे सगळे व्यवहार हळूहळू शांत होत असतात. सकाळपासून चालू असलेल्या कामाच्या व्यापांचे डोळे, संध्याकाळ झाली, की दमून मिटायला लागतात ! सूर्य अस्ताला गेलेला असतो, पण त्याचा संधिप्रकाश मात्र आभाळात अजून रेंगाळत असतो. तो मुक्त-हस्ताने आकाशात रंगांची उधळण करत असतो.

दिवसभराची रोजनिशी, तो आकाशाच्या canvaas वर मांडत असावा...!
त्याच वेळी खऱ्या अर्थाने संध्याकाळ झाल्याचा feel येतो, नाही ?   मग थोड्या वेळाने तो संधिप्रकाशही जातो.. 
अंधार पडू लागला की बाहेर अंगणात खेळणार् या आपल्या मुलांना, आया जशा घरी बोलावतात;  तसाच सूर्यही आपल्या बागडणार्या किरणांना डोंगरापल्याड घेऊन जातो!

मग दिवेलागणीची वेळ होते..
"शुभंकरोति कल्याणमं आरोग्यम् धनसंपदा l
शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते ll "
एव्हढं जरी डोळे मिटून म्हटलं ना तरी खूप छान वाटतं..
हल्ली मुळात संध्याकाळी घरीच नसतं कुणी.. सगळे कामावरच असतात.. घरातल्या सगळ्यांची एकत्र गाठ पडते, ती एकदम रात्रीच्या जेवणाच्या वेळी !
पण असं असलं तरी संध्याकाळ झाली की, अजूनही आपल्याच आतमधे शुभंकरोतिचा सूर घुमायला लागतो. तो संथ उदबत्तीचा दरवळ, घंटेची ती पावन किणकिण.. वाह ! एक निराळीच मैफिल जमते ! त्या मैफिलीत "संध्याकाळ " ही स्वतःच एक राग बनून जाते !
थोडक्यात काय ! सूर्य निजायला गेल्यावर, त्याच्या पाठीमागे निसर्ग आणि आपण ज्या काही गप्पागोष्टी करतो, त्या सगळ्याची मिळून तयार होते...

"एक संध्याकाळ !!"

-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा