शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

अक्षरे पुसली तरी...

 नमस्कार मंडळी, मी 'प्रेम' बोलतोय ! दमून-भागून घरी आल्यानंतर, आई आपल्याला ज्या मायेने जवळ घेते, ते प्रेम ! कितीही कामं असली तरी, केवळ आपल्यासाठी ऑफीसातलं सगळं काम उरकून बाबा ज्या आतुरतेने घरी येतात, ते प्रेम ! खरंतर प्रेम हे प्रत्येक नात्यात असतंच. पण काय करणार ? ज्या दोन व्यक्तींमध्ये ते आहे, त्यांना त्याची जाणीवंच नसते बऱ्याचदा ! लोक प्रेमाला, म्हणजे मला, गृहीत धरायला लागतात आणि इथंच सगळं गणित चुकतं !

मी जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो ना, तेव्हा तुमचं आयुष्य, हे आयुष्य राहत नाही ! ती एक सुंदर, कोऱ्या, आखीव पानांनी सजलेली, अक्षरांचा स्पर्श व्हावा म्हणून आसुसलेली 'वही' बनतं ! याआधी तुम्हा सर्वांची पाटी कोरी असते ; किंवा, तुम्ही जे काही लिहाल, ते तुम्ही स्वतःच खोडूही शकता, याची तुम्हाला खात्री असते. पण मी जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो ना, तेव्हा त्यावर उमटवलेली अक्षरं तुम्ही, इतक्या सहजासहजी नाही पुसू शकत !
Pencil मधल्या शिसाइतका, किंवा पेनमधल्या शाईइतकाच तुमचा जीवही ओतता तुम्ही या अक्षरांमध्ये ! अनेकदा, तुमची ही 'प्रेमाची वही' यशस्वी होतेच असं नाही. मग माणूस ते सगळे गोड अविष्कार खोडण्याचा प्रयत्न करू लागतो. अनेक माणसं यात खरोखरच यशस्वी होतातही ! पण काहींची आयुष्यं मात्र यातच गुरफटत राहतात. यातले, आकार-उकार, काना-मात्रा, वेलांटी-विसर्ग यांच्या सापळयातून ते बाहेरच पडू शकत नाहीत..
अजूनही त्यातल्या एखाद्या जोडाक्षराला ते स्वतःचं मन जोडू पाहतात !
एखादा पूर्णविराम चुकून, घाई-घाईत उमटलाय का, हे पुन्हा पुन्हा तपासून बघतात !

हे संबोधन इथे नको होतं का ?
ह्या "पूर्ण"विरामाचा, "स्वल्प"विराम होऊ शकतो का ?
वहीतलं नक्की कोणतं वाक्य जिव्हारी लागलं, आणि आमचं गाणं बेसूर झालं हे काही त्याला कळत नाही !
सगळी व्याकरणं चुकत जातात मग..
का ? कसं ? कुठे ? कधी ? कोणामुळे ?
अशी अनेक प्रश्नचिन्हं ग्रासून टाकतात त्याला, आणि मग भल्या-भल्यांनाही वहीतला शेवटचा "पूर्णविराम" पचवायची ताकद उरत नाही !!

मग त्यांचं मन या वहीतंच एखाद्या झोपाळ्याप्रमाणे खाली-वर करू लागतं...
अगदी, त्यातली अक्षरे पुसली तरीसुद्धा !!!

-आशुतोष पुरोहित

(लेखक "श्रीहरी जोशी" यांच्या 'अक्षरे पुसली तरी..' या एकांकिकेवर आधारित )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा