शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

शिळोप्याच्या गप्पा...!

 "काय ह्या बायका बडबड करत असतात राव... स्वयंपाकघरात 'काम कमी आणि गप्पा जास्त' अशी स्थिती असते." गोविंदराव स्वतःच्या डेरेदार ढेरीवरुन हात फिरवत म्हणाले.. त्यांचं जेवण नुकतंच झालं होतं. त्यामुळे, आधीच मोठ्या असलेल्या त्यांच्या पोटाला, आणखीन सुटायला वाव मिळाला होता...! स्वयंपाकघरातून भांडी सारखी करण्याचे आवाज आणि जोडीला घरातली आई, काकू आणि आजी ह्यांच्या 'शिळोप्याच्या गप्पांचे' आवाज येत होते. गोविंदराव मात्र त्याच गप्पांना वैतागले होते. रोज त्याच चहाड्या, त्याच गोष्टी, दोन दोन चमचे मीठ मसाला अधिक टाकून कानावर पडायच्या. शेवटी वैतागून गोविंदरावांनी TV सुरू केला. TV चा आवाज जरा मोठाच ठेवला. ह्या आवाजाने आतला आवाज लोपेल असं त्यांना वाटत होतं. पण त्याउलट, "अहो ! किती मोठ्याने TV लावलायत... अख्ख्या society ला ऐकू जाईल.." अशी आरोळी आतून आली. शब्दाला शब्द वाढू नये म्हणून गोविंदराव गप्प बसले. त्यांनी TV बंद केला.

"जरावेळ पडूया.. तेच बरं" असं म्हणत त्यांनी hall मधल्या गादीवरच अंग टाकलं. डोळे मिटले..
आता त्यांच्या कानांवर फक्त आतल्या गप्पा आदळत होत्या.
त्यांच्या नकळत,  कानांवर पडत असलेल्या गप्पा, ते ' ऐकायला' लागले..
चार सुख-दुःखाच्या गोष्टींची ही सुरेल देवाणघेवाण त्यांनाही interesting वाटू लागली..
"अमक्याच्या मामाच्या मुलाचं लग्न ठरलंय.. तमक्याची मुलगी आजारी आहे.. अमकी स्वभावाने फार खाष्ट आहे मेली.." असे अनेक तिखट-गोड संवाद तिथे रंगले होते..
कितीतरी 'अमके' आणि कितीतरी  'तमके'..!

आईला काळजी लागली होती, शेजारच्या सुषमाच्या लग्नाची.. "आई, त्या आपल्या शेजारच्या सुमीचं "bad luck" नाही का हो अगदी..? अजून लग्नाचा पत्ता नाही बिचारीच्या.." आई आजीला म्हणाली.
"हो ना गं.. कोणाचे योग केव्हा जुळलेले असतील, आपण नाही सांगू शकत गं !" आजीचं 'नेहमीचं' सांत्वन..
" हो ना.. आता आमच्या office मधील प्रमिलाच घ्या ना, पळून जाऊन लग्न करावं लागलं हो बिचाऱ्यांना. परवानगीच नव्हते देत घरचे.. मग काय करणार हो हे दोघे तरी.." काकूची विषयाला फोडणी ! तिच्या स्वयंपाकाप्रमाणेच गप्पांमधली फोडणीही जरा अधिक झणझणीत लागली ! आता तर काय! विषयाला उधाणच आलं..!
"अगं पण हे पळून जाऊन लग्न करायचं fadच झालंय बाई हल्ली.. काय ते, thrill का काय म्हणतात तसलं असतं म्हणे, असं पळून जाण्यात.." आईने उगाच आपली भाबडी शाल पांघरली.
"मला तर बाई मेलीला काही कळतंच नाही. आमच्याकाळी तर आई बाबा सांगतील ती पूर्व दिशा. त्यांनी म्हटलं याच्याशी लग्न कर, की करायचं.. हल्लीसारखं पळून बिळून जायची सोय नव्हती.." आजीचं रसाळ 'पुराणकथा' वर्णन...
तिघीही जणी आपापल्याच विश्वात रंगल्या होता, पण एकमेकींची साथ सोडत नव्हत्या... घट्ट होते रुणानुबंध.. अनेक वर्षांच्या सहवासानी अगदी मुरलेले..!

व्यक्ती तीनच होत्या, पण 'पात्रं' मात्र जमली होती तिथे...! त्या तिघींनी अशा अनेक 'अमक्या-तमक्यांचं' चिमुकलं विश्व पार खुलं करून ठेवलं होतं एकमेकींसाठी...!
'हातचे न राखता' आपल्या सुख-दुःखाचे हिशेब सढळपणे मांडण्याची शक्ती फक्त 'स्त्रीत' असते... त्यांना चटकन जाणवून गेलं..
आपल्या आतल्या दुखर्या नसा आणि सुखाचे श्वास असे ' share ' केल्यावर किती मोकळं वाटत असेल ना...

एव्हाना स्वयंपाकघरातलं काम आटोपलं होतं. भांडीही सारखी करून झाली होती..
पडवीचं दार लोटलं गेलं आणि,
आई, आजी आणि काकू वामकुक्षी घ्यायला खोल्यांत गेल्या..
स्वयंपाकघर आता शांत झालं होतं..

आणि गोविंदरावांच्या लक्षात आलं...

अनेक 'हरहुन्नरी किस्से' संपवून, ती गप्पांची मैफिलसुध्दा, तिथेच आडवी झाली होती....

-आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा