पेन्सिल टेकवली कागदावर की भराभर उतरतात शब्द त्यातून.. तुला लिहिताना..
घसरगुंडीवरून गोंडस मुलं कशी धमाल, आरडाओरडा करत खाली येतात ना, तसेच वाटतात हे शब्द.. तुला लिहिताना..
जणू काही त्यांना मोकाट वाट मिळालेली असते, तुझ्याबद्दल जगाला भरभरून सांगण्याची...
माझ्याही नकळत मलाच खूप काही सांगून जातात तुझ्याबद्दल हे शब्द... तुला लिहिताना...
कधी ते कवितांचे कपडे घालून उतरतात, तर कधी नुसती वाक्यं बनून येतात.. पण त्यांची ही धमाल फक्त पाहत बसते मी.. आणि अनुभवते त्यांच्यातल्या तुला...
त्यांचं 'पोर'पण तुझी चाहूल देऊन जातं मला..
तू जेव्हा एकदाचा बघतोस माझ्याकडे, तेव्हा कुठे हा मनाचा दंगा शांत होतो... घसरगुंडी सगळा खेळ आवरून निघून जाते...
उरतोस फक्त तू...
त्या लहान मुलांमधला, माझ्यामधला...
आणि मनाच्या या दंग्याने धसमुसळत हट्टाने कागदावर उतरलेला...
तू....
- तोषा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा