शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

आल्हाद 'पानोपानी'...!

 माझं  इंजिनियरींग कॉलेज... नुकतीच थोडं निराश करणारी बातमी ऐकली होती. डोक्यात निराशेनं ग्रासलेल्या विचारांचं काहूर माजलं होतं... निस्तेज मन.. कुठेच प्रकाश दिसत नाही अशी भेदरलेली अवस्था... खूप प्रश्न... खूप प्रश्न.. उत्तरं नसणारे... किंवा मला न कळणारी उत्तरं असणारे... उलट्या सुलट्या, चांगल्या वाईट, सगळया विचारांचा प्रचंड कोलाहल.. कॉलेजच्या कॉरीडॉर मधून चाललो होतो. इतक्यात हलकेच कानावर आली, ती  झाडाच्या निवांत पानांची सळसळ.. प्रचंड अस्वस्थ असणाऱ्या मला, त्या निवांत झाडाचं भारी कौतुक वाटलं.. तिथेच थांबलो.. कठडयाला टेकून उभा राहिलो.. कदाचित ती पानं काहीतरी बोलत होती माझ्याशी... सांगत होती मला काहीतरी... ते ऐकण्यासाठी नकळत थांबलो.. अचानक लक्ष गेलं, समोरच्या इमारतीकडे.. त्या इमारतीची भिंत... आणि त्या भिंतीवर निवांतपणे अंग पसरणारं दुपारचं शांत ऊन... मला हे सगळच हळूहळू शांत करत होतं.. अंतर्मुख करत होतं.. इतक्या सगळ्या चांगल्या -वाईट, विधायक -विघातक, सकारात्मक -नकारात्मक गोष्टी आजूबाजूला घडत असताना, माझी ही मित्र मंडळी इतकी शांत कशी काय ?? त्यांना ह्या गोष्टी जाणवत नव्हत्या का ?..

त्या पानांना मी काही विचारायला गेलो किंवा त्यांच्याशी काही बोलायला गेलो तरी त्यांची भाषा मला कुठं कळत होती...?
ती फक्त व्यक्त होत होती.. कदाचित स्वतःपुरतीच..
मी त्यांना फक्त अनुभवाव, हेच त्यांना अपेक्षित असाव..
हळूहळू मीही शांत होत होतो... विनाकारण..
अर्थात, ते शांत होणं मला सुखावतच होतं.. असो..
पण ह्या सगळया मंडळींचं स्वतःचं असं काही म्हणणं नव्हतंच बहुतेक.. ती फक्त होती..
पण त्यांचं हे "नुसतं असणच" खूप आकर्षक होतं माझ्यासाठी...
हळूहळू माझ्या मनातल्या प्रश्नांची निःशब्दातून उत्तरं येत होती.. नवीन उभारी मिळत होती..
घडयाळाकडे पाहिलं.. पावणेदोन वाजल्यचं ते सांगत होतं.. लेक्चर सुरू व्हायची वेळ झाली म्हणून वर्गाकडे जायला निघालो...
निघताना पुन्हा एकदा कानावर आली... त्याच पानांची आनंदी सळसळ...
पोटभर साठवून घेतली ती स्वतःत....
नव्याने उभारी मिळवण्यासाठी...

- आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा