शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

गाणं

 आज घरी येताना एक झाड दिसलं. एकटंच उभं होतं ते.. traffic, धूळ, प्रदूषण कशाचीही पर्वा न करता ! तेही enjoy करत होतं बहुतेक ती माणसांची धावपळ..

तो कोलाहल, ती लगबग.. कोणाला कोणाची पर्वाच नाहीए, याची त्याला एकट्यालाच पर्वा होती..!
त्याच्या मागे एक mall होता. तिथे तर काय, तरुण मुलमुलींची तोबा गर्दी ! सतत येजा..
कोणी झालेली खरेदी पाहून excite होत होतं, कोणी होणाऱ्या खरेदीची स्वप्न रंगवत होतं.. कोणी कोणाच्या गळ्यामिठी पडून दिलातल्या गोष्टी करत होतं..
एवढ्या गर्दीत असूनही ते झाड मात्र एकटं होतं.. कारण तिथे त्याच्यासारखं कोणी नव्हतं ना.. स्थितप्रज्ञ.. तरीही "हिरवं"...!
मी त्याला गंमत म्हणून विचारलं, " काय रे बाबा, तुला एकटं नाही वाटत ? गुदमरत नाही तुझा जीव या गर्दीत ?"

"गुदमरतो की.. अगदी 100% गुदमरतो.." झाड बोललं... ( "अनोळखी व्यक्तिंशी बोलू नका" ही warning त्यांना नसावी बहुधा...)

"मग अशा वेळी तू काय करतोस ?" मी.

( थोडं हसून ) "तू पाहिलंस..? माझ्या मागे एक mall आहे.. तिथे जेव्हा लोक येत जात असतात ना, तेव्हा त्या पायरीवरुन त्यांच्या येजा करणाऱ्या पायांचा, दणदण आवाज येत असतो.. हळूहळू त्या आवाजाला ठेका सापडतो.. त्या ठेक्यातून एक "धावपळीचं " गाणं निर्माण होतं..
"कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. आटापिटा कशासाठी ? वीतभर पोटासाठी " हाच सूर असतो त्या गाण्याचा...!

तिळाएव्हढ्या जीवाला जपण्याकरिता माणूस करत असलेली डोंगराएव्हढी धडपड पाहून खूप बरं वाटतं.. खरंच...
कारण, त्याच्या त्या धडपडीला स्वतःचं असं एक गाणं असतं !!! अगदी जीव ओतून संगीतबद्ध केलेलं..!
आणि स्वतःच्याच आनंदासाठी पुन्हा पुन्हा आळवलेलं !"

"तुला इतकं सुंदर जग दिसतं.. मग आमच्यात हा त्रास, भीती, कंटाळा येतो कुठून ?"

झाड हसून बोललं....

"तंबोर् याला घातलेली गवसणी काढून, हरवलेलं गाणं एकदा गाऊन पहा..  आकाश पुन्हा निरभ्र होईल... "

-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा