रविवार, ११ जून, २०२३

तुम आ गये हो.. नूर आ गया है...

 तुम आ गये हो.. नूर आ गया है... नही तो चरागोंसे लौ जा रही थी..


गुलझारजींची 'सुलझा'वणारी शब्दरचना, आणि किशोरदांचा स्वर्गीय स्वर... अहाहा ! गाणं ऐकता ऐकता आपणच त्या गाण्यात विरघळून जातो..

त्या दिवशी असाच काही कामानिमित्त दगडूशेठ गणपतीसमोरून चालत जात होतो. अचानक कानांवर हे गाणं पडलं. एका शिंप्याच्या दुकानात हे दैवी स्वर झंकारत होते. तो अतिशय तल्लीनतेने त्याचं काम करत होता. जगाचा विसर पडला होता त्याला ! मधून मधून तोही हे गाणं गुणगुणत होता, मान डोलवत होता. तोंडातली त्याची measurement ची पट्टी सुद्धा, शेजारच्या table fan वरून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतावर डुलत, ह्याच गाण्यावर ताल धरत होती. कुणाचे ताल कसे जुळतात पहा..!
मी लांबूनच ते दृश्य बघत होतो. खरंतर त्याच्या दुकानात ना गिऱ्हाईक होतं, ना त्याचा कोणी चाकर..
मग तो 'तुम आ गये हो, नूर आ गया है..' हे कोणाला म्हणत असेल या विचारात मी पडलो..
माणसाला एकटं राहायची सवय नसते.. सतत त्याला कोणीतरी आजूबाजूला हवं असतं.. गुलझारजींच्या भाषेत सांगायचं झालं तर, त्याला 'नूर' हवा असतो.. हा नूर मिळाला की आपोआप त्याला त्याचा सूर सापडतो !
पण हा शिंपीदादा तर एकटाच गातोय.. "त्याला कोणता नूर मिळाला असेल ? कोणता सूर त्याचं 'संगीत' झाला असेल ? "माझ्या मनात विचार सुरू झाला..
खरंतर हा विचार करण्याचं मला काही एक कारण नव्हतं.. पण या अनोख्या गाण्याने आमचे सूर जुळवले होते, रेशीमगाठींसारखे..!
शेवटी मी विचार करून करून थकलो. मी म्हटलं, "जाऊ दे.. आपल्याला काय करायचंय ?" मी पुढे पावलं टाकायला सुरूवात केली आणि....
आणि अचानक आतून उत्तर आलं.. ते उत्तर ऐकल्यावर मी शहारलो.. अंगावर काटा उभा राहिला.. लख्खकन वीज चमकावी तसा अर्थ ध्यानात आला माझ्या..

-कौन होगा उसका नूर ?..

-.... "शायद उसकी तनहाई "... 

जिने की तुम से, वज़ह मिल गयी है..
बड़ी बेवजह जिंदगी जा रही थी...

आत किशोरदा गात होते, आणि शिंपी मान डोलवत होता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा