रस्त्यावरून जाताना बाजूला काही दगड पडलेले दिसले.. काही ओबडधोबड तर काही रेखीव.. काहींमध्ये विशिष्ट आकार मला जाणवत होते, दिसत होते.. तर काही अगदीच अर्थहीन वाटत होते.. काही तुटले होते विचित्र पद्धतीने.. काही अगदीच टोकदार होते, शस्त्र म्हणून वापरता यावे असे.. काही तुळतुळीत गोट्यांसारखे होते, काहींना मधेच छिद्रही पडली होती... आपण करू तसा यांचा वापर.. स्वतःचं असं फारसं काही म्हणणं नाही यांचं.. तसंही एका कडेला नुसतेच पडून राहतात वर्षानुवर्षं.. कोणी बघतही नाही यांच्याकडे, काही म्हणतात का ते ?...
गरज नसलेल्या वस्तू माणूस आपोआप स्वतःपासून लांब ठेवतो..
नात्यांचंही असंच आहे.. या दगडांसारखं.. एका बाजूला पडून असतात ती.. वर्षानुवर्षं कोणी बघतही नाही त्यांच्याकडे.. माणूस नाती "वापरतो" जास्त आणि "जपतो" फार कमी... असतील ना थोडी ओबडधोबड... काय फरक पडतो ? योग्य ठिकाणी छिन्नी मारली की आपोआप अर्थ येईल त्यांच्या आकारांना.. आपण पाथरवट व्हायचं..
प्रत्येकच दगडातून मूर्ती नाही घडत. त्याच्या ओबडधोबडपणातंच त्यांचं सौंदर्य असतं. ते आपण ओळखलं पाहिजे.. जपलं पाहिजे..
कोणताच दगड नुसता सोडून नाही द्यायचा, कारण कुठलाच दगड "अडगळ" नसतो. त्याच्यात एक शिल्प असतं. ते आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे..
कुठलंच नातं "नुसतं पडून" राहू द्यायचं नाही.. त्यात अर्थ असतोच. आपण आपल्यातला पाथरवट जागा करायला हवा इतकंच..
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा