शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

देखणी मनं

 बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट.. दोन चार जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे आवाज सोडले, तर बाकी शांतता भरून राहिलेली.. वृक्ष वल्ली बहरलेल्या.. बाजूने एक मंजुळ ओढा झुळझुळ वाहत जातोय.. नारळी-पोफळीच्या बागांनी सजलेलं परसदार... शांत वारा काही सुखांची गाणी गुणगुणत वाहतोय.. आभाळातल्या स्वच्छ सूर्याची एक तिरीप कौलारू घराला सोन्यानं मढवत्ये.. अंघोळीसाठी काढलेल्या पाण्याच्या बंबाची वाफ, एक पावित्र्य पसरवत्ये.. स्वयंपाकघरातून आनंदानं रांधणाऱ्या बांगड्यांचा किणकिणाट मांगल्य पेरून जातोय या वातावरणात... देवघरात खर्ज स्वरात नामस्मरण चालूए.. तुळशीची माळ एक एक मणी मागे टाकत पूर्णत्वाकडे चाललीये.. समोरच्या मोकळ्या अंगणात काही तरूण मुलं बलोपासना करतायत..

काही चिमुकले हात मोठ्या एकाग्रतेने दारापाशी रांगोळ्या काढतायत...
चला.. आता हळूहळू दिवस पुढे सरकू लागलाय.. पहाट संपली..! कोंबडा आरवला...
आता आई येईल.. मला ओवाळेल.. सगळेजण भक्तिभावाने नमस्कार करतील.. मी सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देईन..
"असेच गुण्या-गोविंदाने नांदा!"
आशीर्वाद घेण्यासारखंच आशीर्वाद देण्यानंही आपल्याला बऱ्याचदा प्रसन्न वाटतं, नाही ? सगळेजण इथे माझ्या समोर उभे राहतात, मला खूप आदराने आणि प्रेमाने नमस्कार करतात..
माझं वृंदावन अगदी तृप्त होतं, त्यांची ही आपुलकी पाहिली की..!! मग अजूनच तेजस्वी दिसायला लागते मी..
घरात येणारे पाहुणेरावळे, मानाची, मोठी माणसं, उगाच म्हणतात का,
"दारापुढलं तुळशीवृंदावन किती देखणं आहे हो तुमच्या!!"
पण त्यांना काय ठाऊक, माझ्याहून या घरातल्या माणसांची मनं जास्त देखणी आहेत ते !!

-आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा